इंझोरी (वाशिम): मे महिना संपल्यानंतरही जिल्ह्यात उन्हाचा पारा ४४ अंशाच्यावर असताना शरीराची दाहकता घालवून उत्साह वाढविण्यासाठी प्रकल्पाच्या कालव्यात युवक मंडळी जलतरणाचा आनंद घेत असल्याचे चित्र इंझोरी परिसरात पाहायला मिळत आहे. जून महिना सुरू झाला असला तरी, उन्हाची दाहकता कमी होण्याची कुठली चिन्हे अद्याप दिसत नाहित. उन्हाचा पारा आताही ४३ अंशावरच आहे. या उन्हामुळे जिवाची लाही लाही होत असून, उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. प्रत्येक जण उन्हापासून बचावासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत आहेत. शितपेय प्राशन करून घशाची कोरड मिटविणे, सावलीत झाडाचा हवेशीर आधार घेणे किंवा घरातच कुलरमध्ये विश्रांती करण्यावर भर दिला जात आहे; परंतु शेतात रखरखत्या उन्हात काम करणाºया मंडळींना मात्र रखरखत्या उन्हात काम करून दमल्यानंतर झाडाखाली आधार घेण्याशिवाय पर्याय नाही. अशात काही युवक मंडळी शरीराचा थकवा आणि उन्हाचा दाह घालविण्यासाठी शिवारात असलेल्या कालव्यात जलतरणाचा आनंद लुटत आहेत. कारंजा तालुक्यात आणि मानोरा तालुक्याच्या काठावर म्हसणीनजिक असलेल्या अडाण प्रकल्पातून शेतकºयांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कालवे तुडूंब भरून वाहत असल्याने युवक मंडळी तासनतास या कालव्यात मनसोक्त जलतरण करीत आहेत.
४५ अंश तापमानात युवकांची कालव्यात जलक्रिडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 3:05 PM