यावेळी युवकांनी किल्ले माहूरगड येथील पूर्वीचा मुख्य दरवाजा व आताच्या हत्ती दरवाजासमोरील गाजरगवत, तण, प्लॅस्टिक कचरा साफ करून पर्यटकांसाठी रस्ता मोकळा केला. या मोहिमेत आकाश कुचेकर, बादल पवार, विनोद कुचेकर, गणेश वाडेकर, अजय राठोड, प्रथमेश आराधे या सहा युवकांसह संकल्प सुशिक्षीित बेरोजगार बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
या मोहिमेबद्दल माहिती देताना आकाश कुचेकर म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या काळातील किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारसह प्रत्येकाची आहे. त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारून संपूर्ण राज्यात विविध जिल्ह्यांतील किल्ल्यांवर ही मोहीम राबविली जाते. सदर मोहीम गेल्या १६ वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. माहूरगड किल्ला हा पडझडीच्या अवस्थेत असून गडाला ठिकठिकाणी झाडाझुडपांनी व प्लाॅस्टिक कचऱ्याने वेढले आहे. त्यामुळे गडाचे मूळ सौदर्य लोप पावले आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांना गडाचे सौदर्य आणि त्या अनुषंगाने शिवरायांचा स्वाभिमानी व पराक्रमी इतिहास अनुभवता यावा या दृष्टिकोनातून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. परकीयांच्या आक्रमणापासून रयतेला सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी हे अभेद्य गडकिल्ले बांधले होते, परंतु आज हे गडकिल्लेच संकटात आहेत. त्यामुळे प्रत्येक युवकाने स्वराज्याच्या रक्षणासाठी बांधलेल्या या किल्ल्यांचे जतन व महाराजांचा वारसा कायम ठेवण्यासाठी पुढे आले पाहीजे, असे आवाहन कुचेकर यांनी केले.