लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १०० युवकांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी १९ मार्चपर्यंत आॅफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.मागासवर्गीय, अनु. जातीतील विद्यार्थी, युवक हे स्पर्धात्मक परीक्षेत टिकावे या उद्देशातून बार्टी, पुणे या संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. अनुसूचित जातीतील १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना बँक, रेल्वे, एलआयसी, लिपिकवर्गीय यासह अन्य स्पर्धा परीक्षेसंदर्भात माहिती देणे, अभ्यासक्रम, परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी चार महिन्याचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण वाशिम येथे दिले जाणार आहे. संबंधित युवकांना, विद्यार्थ्यांना १९ मार्च २०२० पर्यंत आॅफलाईन पद्धतीने आवेदनपत्र सादर करावे लागणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया गरिब व होतकरू विध्यार्थ्यांना संजिवणी देणारा हा उपक्रम गेल्या १० वर्षांपासून सातत्याने सुरु आहे. या प्रशिक्षणासाठी २२ मार्च २०२० रोजी चाळणी परीक्षा होणार असून उत्तीर्ण उमेदवारांपैकी ३० टक्के महिला, ४ टक्के दिव्यांग, ५ टक्केअनुसुचित जातीतील विशेष घटक व उर्वरित सर्वसाधारण ६१ टक्केअशी आरक्षणनिहाय ५०-५० विद्यार्थ्यांच्या तुकडी मध्ये एकूण १०० विद्यार्थ्यांची चार महिन्यासाठी निशुल्क प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांना ८० टक्के हजेरी असल्यास ३ हजार रुपये प्रतिमहिना विद्यावेतन आणि ३ हजार रुपये किमतीचा पुस्तकांचा संच व इतर वाचन साहित्य मोफत दिल्या जाणार आहे. इच्छूक युवकांनी १९ मार्चपर्यंत आॅफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन बार्टी, पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्थेने केले.
युवकांना मिळणार स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 2:14 PM