लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून सखोल चौकशी करून दोषींविरूद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी ब्राम्हणवाडा (ता.मालेगाव) येथील गोपिनाथ शिवाजी नागरे नामक युवकाने सोमवार, ३ जून रोजी सकाळच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ आंदोलन केले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.यासंदर्भातील निवेदनात गोपिनाथ नागरे याने नमूद केले आहे, की ब्राम्हणवाडा येथे रोजगार हमी योजनेतून कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. मजूर कामावर हजर नसतानाही त्यांच्या खात्यात मजूरीची रक्कम जमा करण्यात आली. कामावर बालमजूर लावण्यात आले. बहुतांश कामे अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. याबाबत संबंधितांना लेखी निवेदन देवून माहिती मागितली असता, ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी, कर्मचाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा गोपिनाथ नागरे याने २८ मे २०१९ रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या निवेदनात दिला होता. दरम्यान, मागणी मान्य न झाल्याने गोपिनाथने सोमवारी सकाळीच गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केले. यादरम्यान पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनुने, नायब तहसीलदार डी.आर. महल्ले, सहायक गटविकास अधिकारी आर.ए. सोनुने आदिंनी गोपिनाथला आत्महत्येपासून परावृत्त करून खाली उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तहसीलदार रवी काळे यांनीही घटनास्थळी धाव घेवूनयेत्या दहा दिवसांत ‘रोहयो’च्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर गोपिनाथ नागरे याने आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी मंडळ अधिकारी इंगळे, विस्तार अधिकारी पी.डी. लोखंडे, बीट जमादार उत्तम राठोड, अमोल पाटील आदिंची उपस्थिती होती.‘रोहयो’च्या कामांबाबत ग्रामसेवक, रोजगार सेवकही अनभिज्ञगोपिनाथ नागरेचे आंदोलन सोडविण्यासाठी ब्राम्हणवाडा येथे आलेले तहसीलदार रवी काळे यांनी गावात झालेल्या रोहयोच्या कामांबाबत ग्रामसेवक एन.के. ढंगारे, रोजगार सेवक शत्रुघ्न खिल्लारे यांना विचारणा केली असता, नागरेच्या तक्रारीत नमूद कामांबाबत कुठलेही दस्तावेज अथवा नोंदी नसल्याचे दोघांनी सांगितले. यावरून ते कामांबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
‘रोहयो’तील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी युवकाचे ‘शोले’ आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 5:52 PM