लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत कारंजा मतदार संघात अल्पशा मतांनी पराभूत झालेले भारिप-बमंसचे प्रदेश महासचिव तथा वाशिम जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी प्रदेशाध्यक्ष अशोकराव सोनोने यांच्याकडे आपल्या दोन्हीही पदांचा राजीनामा सोमवार, १९ आॅगस्ट रोजी पाठविला. दरम्यान, भारिप-बमसंची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाली असून २० आॅगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ अध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे हे वाशिम येथे जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी येत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून मिळाली.मो. युसफ पुंजानी यांनी पाच वर्षांपूर्वी भारिप बहुजन महासंघात प्रवेश करून कारंजा-मानोरा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यानंतर त्यांच्याकडे भारिप-बमसंच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ते जिल्हाध्यक्ष असताना पक्षाला नगर पालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बºयापैकी यश मिळाले. त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी त्यांची वर्णी लागली. अशातच १९ १९ आॅगस्ट रोजी त्यांनी प्रदेश महासचिव आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा पत्रात पुंजानी यांनी नमूद केले की, आपण मागील ५ वर्षांपासून भारीप बहुजन महासंघात कार्य करीत असून, पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी विश्वास ठेवून आपल्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपविले होते. त्यानुसार प्रामाणिकपणे कार्य करून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. आता मात्र वैयक्तिक कारणामुळे आपण दोन्ही पदांचा राजीनामा देत आहोत, असे पत्रात नमूद आहे.दरम्यान, पुजांनी यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यालयीन सचिव रतन बनसोडे यांच्या स्वाक्षरीने वाशिम जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. वंचित आघाडीची जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी २० आॅगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ अध्यक्ष अॅड. महाडोळे हे वाशिम येथे येत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
इतर पक्षात प्रवेशाची शक्यता फेटाळलीभारीप-बमसंच्या प्रदेश महासचिव आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मो. युसूफ पुंजानी यांनी दिला असला तरी, सद्यस्थितीत इतर पक्षात प्रवेश घेण्याबाबतची शक्यता त्यांनी फेटाळली आहे. पक्षातील समर्थक कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करूनच पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या इतर पक्षातील प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चांना तूर्तास विराम मिळाला आहे.गत काही दिवसांपासून पक्षांतर्गत वाद सुरू होते. हे वाद मिटविण्याचा प्रयत्न आपण केला; परंतु वाद मिटले नाही. या वादांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाऊ नये म्हणून आपण भारीप-बमसंच्या प्रदेश महासचिव आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय घेऊ.- मो. युसूफ पुंजानी, कारंजा लाड