वाशिम - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान हाती घेतले असून, १ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यात प्रशासन ‘आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाºयांनी कुटुंबियांशी संवाद साधत शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले.
वाशिम जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी तसेच नागरिकांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. शौचालय नसलेल्या कुटुंंबियांशी संवाद साधणे आणि शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष कुटुंब संपर्क अभियान तसेच प्रशासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा स्वच्छता व पाणी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे आदींच्या नेतृत्त्वात गावोगावी भेटी देऊन लोककलावंतांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. उघड्यावर शौचास जाण्याचे दुष्परिणाम निदर्शनात आणून देणे, गाव हगणदरीमुक्त नसल्यामुळे विकासात्मक कामांसाठी शासकीय निधी मिळण्यात येणारे अडथळे, सामाजिक आरोग्याचा प्रश्न, कुटुंबातील महिलांची प्रतिष्ठा आदीसंदर्भात माहिती दिली जात आहे.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी कासोळा गावात जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, गटविकास अधिकारी खैरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गावातून रॅली काढुन शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या घरावर लाल स्टिकर लावुन शौचालय नसल्याचे गांभिर्य समजावुन सांगितले. लोककलावंतांनी गाणी गाऊन शौचालय बांधायचा आग्रह धरला. कार्यक्रमाच्या शेवटी एक सभा घेऊन लोकांशी संवाद साधला. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी कासोळा हे गाव याच महिन्यात हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. प्रमोद कापडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. कंझरा व अरक येथे पंचायत समिती सभापती निलिमा देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापडे, गटविकास अधिकारी खैरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाºयांनी कुटुंबियांशी संवाद साधत शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले.