वाशिम : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प १९ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पाचे सादरीकरण प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.श्याम गाभणे यांनी केले. सभागृहामध्ये अध्यक्षांच्या वतीने जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य पांडूरंग ठाकरे यांनी वाचन केले. ही अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईन
पध्दतीने पार पडली. मात्र, तरीही १६ सदस्य सभागृहामध्ये उपस्थित होते. सर्व खातेप्रमुख ऑनलाईन पध्दतीने या सभेला हजर होते.
जिल्हा परिषदेच्या सुधारित व मुळ अंदाज पत्रकासाठी १९ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचा संक्रमण काळ पहाता केवळ १६ सदस्य प्रत्यक्षपणे बैठकीला उपस्थित होते. इतर सदस्य व विविध विभागाचे खातेप्रमुख ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.श्याम गाभणे यांनी २०२१-२२ चा ४८ हजार ८२७ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. ६ कोटी २१ लाख रुपयांचा सुधारीत व १४ कोटी ९० लाख २०२०-२१ चे अर्थसंकल्पास मंजूरात देण्यात आली.
................................
अर्थसंकल्पातील तरतूद....
या अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या परिक्षणासाठी २५ लाख, शिक्षण विभागासाठी २८ लाख ५४ हजाराचे, आरोग्य विभागासाठी २८ लाख १० हजार, पाणीपुरवठा विभागासाठी ६० लाख ९६ हजार, मागासवर्गीय शेतकरी घटकासाठी अत्यल्प तरतूद करण्यात आली. तसेच आदिवासी विभागासाठी केवळ ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.अपंग कल्याण विभागासाठी ११ लाख १४ हजार, महिला व बालकल्याण विभागासाठी ११ लाख २० हजार, कृषी विभागासाठी ३२ लाख १३ हजार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायासाठी १२ लाख, पंचायत राज कार्यक्रमासाठी ६२ लाख ७६ हजार, पंचायत विभागासाठी २ कोटी १६ लाख, सार्वजनिक बांधकाम व्यवहारासाठी ७ लाख असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तसेच मागासवर्गीय वस्तीत उभ्या अभ्यासिकाकरिता २५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून मागासवर्गीय वसाहतीत अत्याधुनिक अभ्यासिका उभ्या राहणार असल्याने याचा लाभ होतकरू विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
..............................
जिल्हा परिषदेच्या संपूर्ण वर्षांचा अर्थसंकल्प मांडताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देता यावा याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पा व्यतिरिक्त शोषित दुर्बल घटकांसाठी आणखी निधी खेचून आणून विकास साधण्याचा प्रयत्न आहे.
-डॉ. श्याम गाभणे
अध्यक्ष, जिल्हा परिषद, वाशिम