- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होत असून प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मुलाखती देण्यासाठी इच्छुकांची गर्दी होत असून स्थानिक पातळीवर प्रमुख पक्षांची युती होणार की नाही तसेच स्थानिक काही आघाड्या होतात का याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेचा व पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची जनविकास आघाडीतर्फे इच्छूक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. प्रमुख पक्षाने इच्छूकांकडून उमेदवारी अर्ज मागविले असून, मुलाखतींचा धडाकाही लावला आहे. राज्याच्या राजकारणात नव्याने उदयाला आलेल्या सत्ता समिकरणांचे संभाव्य पडसाद लक्षात घेता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांनी आपापल्या जिल्हा परिषद गट व गणांवर दावा कायम ठेवल्याने ही युती करताना तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी तुर्तास तरी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. गतवेळी भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषदेत केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल वाढविण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. जिल्हा परिषद निवडणुक लढविण्याची तयारी केलेल्या इच्छूकांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज देण्याचा धुमधडाका लावल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक पातळीवर जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची युती तसेच काँग्रेस, राकाँ व सेनेवी युती होणार की नाही याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.अनंतराव देशमुख, वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चाकाँग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आतापर्यंत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात लढविल्या होत्या. एका वेळच्या अपवाद वगळता सन १९९८ पासून ते २०१९ पर्यंत जिल्हा परिषदेत काँग्रेस सत्तेत होती. २०१९ मध्ये अनंतराव देशमुख यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुक लढविल्याने त्यांना पक्षातून निष्काषित करण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही जनविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला असून, अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युतीबाबत प्राथमिक टप्प्यात चर्चा सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. देशमुख यांच्याकडून युतीचा प्रस्ताव आल्याच्या वृत्ताला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत नवीन समिकरण उदयाला येण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.काँग्रेसच्या बैठकीत जाणून घेतली मते !गतवेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक १७ सदस्य होते. यावेळीही काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छूकांची गर्दी असून, ही निवडणूक युती करून लढवावी की स्वतंत्रपणे सामोरे जावे याकरीता ६ डिसेंबर रोजी वाशिम येथे पदाधिकारी व इच्छूक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांनाच उमेदवारी द्यावी, ऐनवेळी पक्षविरोधी कारवाया करणाºयांना यावेळी दूर ठेवावे, असा सूर काँग्रेसमधून उमटत आहे.