लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आगामी विधानसभा निवडणुक येत्या आॅक्टोबरमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दुसरीकडे गत काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींवरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही याच कालावधीत होण्याचे संकेत आहेत. ही बाब गृहित धरून तीन्ही निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा बाळगून असलेल्यांकडून जोरदार ‘फिल्डींग’ लावणे सुरू आहे. निवडणुकीच्या तयारीला मात्र वेळ कमीच मिळणार असल्याचे बोलले जात आहे.आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या तीन महिन्यात अर्थात आॅक्टोबर २०१९ मध्ये होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी या प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळण्याकरिता इच्छुकांकडून जोरदार ‘फिल्डींग’ लावण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील प्रलंबित जिल्हा परिषद व सहा पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्गही मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने १८ जुलै रोजी वाशिम जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्या बरखास्त केल्या. तसेच निवडणुकीने नवीन जिल्हा परिषद, पंचायत समित्या स्थापित होईपर्यंत जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी; तर पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले.दरम्यान, मुदतवाढ संपुष्टात आल्याने एका महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करून नवीन जिल्हा परिषद व पंचायत समित्या अस्तित्वात आणण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १९ जुलै रोजी राज्याच्या निवडणुक आयोगाला दिले आहेत. यामध्ये कुठलाही विलंब व्हायला नको, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिल्यामुळे या निवडणुकाही साधारणत: आॅक्टोबर महिन्यातच होतील, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. यामुळे मात्र विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक लढण्याकरिता इच्छुक असलेल्या उमेदवारांसोबतच राजकीय पक्षांचीही धांदल उडणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
विधानसभेच्या धामधुमीत जि.प. निवडणुकीचेही संकेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 2:23 PM