लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शिक्षण विभागाने द्विशिक्षकी शाळांचे धोरण स्वीकारले असले, तरी राज्यात तब्बल ३ हजार ४६६ शाळा एकशिक्षकी असून, त्यात वाशिम जिल्ह्यातील २५ शाळांचा समावेश आहे. केवळ शासनाचे धोरणच नव्हे, तर सामाजिक आणि भौगोलिक कारणांमुळे अनेक शाळा एकशिक्षकी झाल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.शासनाच्या मिशन ब्लॅक बोर्ड या उपक्रमांतर्गत नव्वदच्या दशकांत शाळा द्विशिक्षकी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु गेल्या काही वर्षांत शाळांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकर्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे, तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या. वाशिम जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांची संख्या १,४२०च्या वर आहे. त्यात प्राथमिक शाळांची संख्या लक्षणीय असून, गावागावांत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्याने, शासकीय मराठी शाळांतील विद्यार्थी संख्येत घट झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २५ शाळा एकशिक्षकी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यातील १० पेक्षा अधिक शाळांत विद्यार्थ्यांची पटसंख्या १० पेक्षाही कमी असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असून, सामाजिक व भौगोलिक कारणांमुळे या शाळा द्विशतकी करणे शक्य होऊ शकले नाही.
इंग्रजी शाळांकडे कलगेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पाल्याचा प्रवेश करण्याकडे पालकांचा कल वाढला असून, इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे आकर्षित होणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शासकीय व मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे, तसेच अनेक वर्षांपासून शिक्षक भरती न केल्यामुळे पुन्हा एकशिक्षकी शाळा निर्माण झाल्या.
एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी करण्यात विविध अडचणी आहेत. त्यात पटसंख्या कमी असणे, तसेच शिक्षकांच्या निवृत्तीमुळे पदे रिक्त होणे, या प्रमुख अडचणी आहेत, शिवाय नवी शिक्षक भरतीही एवढ्यात झाली नाही. तथापि, पर्यायानुसार टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी करण्यात येतील.- गजाननराव डाबेराव, प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जि.प. वाशिम