वाशिम .. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी २७ मार्च राेजी कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना धक्का दिला. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे तिनही प्रवेशद्वारे सकाळी ९:५० वाजता बंद करुन त्यांना कुलुप लावण्याचे आदेश दिले आणि उशिरा येणाऱ्यांना बाहेरच ताटकळत थांबण्याची वेळ आली. नंतर सुमारे ११:१५ वा. गेटबाहेर येऊन सीईओ वाघमारे यांनी उशिरा येणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. जिल्हा परिषदेत मार्च एंडच्या कामाची लगबग सुरु असुन सकाळी- सकाळी जिल्हा परिषदेचे तीनही चॅनल गेट कुलुप बंद दिसल्याने काही क्षण कर्मचाऱ्यांसह बाहेरुन येणारे नागरिकही बुचकाळ्यात पडले होते.
कार्यालयात येण्यास उशिर होत असल्यास जिल्हा परिषदेच्या व्हॉटस्अप ग्रुपवर संदेश संदेश टाकण्याचे निर्देश यापूर्वीच सीईओ वाघमारे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिले होते. तरीही आज सुमार ५० कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर आपला संताप व्यक्त केला.
“उशिरा कार्यालयात येऊन कर्तव्यात कसुर करता म्हणुन वाशिम जिल्हा हा अकांक्षित राहिला… तुमचे घर आकांक्षित आहे का..” असा संतप्त सवाल करीत त्यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तीन वेळा कार्यालयात विलंबाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.