वाशिम : मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आता राजीनामास्त्र उगारण्यात आले असून, वाशिम येथे जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी गुरूवार, २६ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला व्यापक प्रतिसाद लाभत असून, वाशिम जिल्ह्यात २४ जुलैपासून विविध टप्प्यात बंद, रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान, २६ जुलै रोजी मराठा आरक्षण, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह प्रमुख मागण्यांसाठी शासनस्तरावरून विलंब होत असल्याचे पाहून रिसोड तालुक्यातील कवठा जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनामा पत्रात नमूद केले की, सकल मराठा समाजबांधवांतर्फे विविध मागण्यांसंदर्भात सन २०१७ मध्ये राज्यात विविध टप्प्यात शांततेच्या मार्गाने मुकमोर्चा, आंदोलन करण्यात आले. मराठा समाजास आरक्षण, शेतकºयांच्या हिताच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असलेल्या स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी यासह प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात शासनस्तरावर ठोस निर्णय, अध्यादेश निघत नसल्याने वाशिम जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असे नमूद आहे.
मराठा आरक्षणसाठी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 8:26 PM