वाशिम : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठा योजनांतर्गत जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. यापोटी दरवर्षी आकारली जाणारी पाणीपट्टी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वसूल करून ‘मजिप्रा’ला देणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून वाशिम जिल्हा परिषद आणि कारंजा, वाशिम नगर परिषदांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा केली नाही. सद्या ही रक्कम ६ कोटी ८१ लाख ४९ हजार ५८३ एवढी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली.प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्हा परिषदेकडे सद्य:स्थितीत ‘मजिप्रा’चे २ कोटी ६३ लाख ४२ हजार ४८० रुपये पाणीपट्टी थकीत असून कारंजा नगर परिषदेकडे १ कोटी ४१ लाख ६३ हजार २६३ रुपये आणि वाशिम नगर परिषदेकडे २ कोटी ७६ लाख ४३ हजार ८४० रुपयांची रक्कम थकलेली आहे. मार्च २०१८ पूर्वी ही रक्कम वसूल करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून मोठा आटापिटा करण्यात आला. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
थकबाकीमुळे ‘मजिप्रा’ अडचणीत!पाणीपुरवठा योजनांतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा करणे आणि त्याव्दारे वसूल होणाºया पाणीपट्टीवरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये काम करणाºया कर्मचाºयांच्या पगारीसह इतर सर्व खर्च भागविला जातो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आजमितीस कोट्यवधी रुपयांच्या घरात रक्कम थकीत असल्याने ‘मजिप्रा’ आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी अदा करावी, असे आवाहन ‘मजिप्रा’चे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी केले.