- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनी एकत्र लढण्याच्या प्रयत्नांना काही जागांचा अडसर ठरत असून, याच कारणावरून रविवारी स्थानिक नेत्यांच्या झालेल्या मॅरेथॉन बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. महाविकास आघाडीचा चेंडू वरच्या कोर्टात गेला असून, उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी नेमका काय आदेश येणार, याबाबत इच्छूक उमेदवार संभ्रमात पडले आहे. काही पक्षांनी तर उमेदवारांना एबी फॉर्मही वाटप केल्याने सर्वच जागांवर आघाडी होण्याची शक्यता मावळली असल्याची चर्चा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. याच अनुषंगाने रविवारी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची मॅरेथॉन बैठक झाली. मात्र, या बैठकीत काही जागा वाटपावर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. या पोटनिवडणुकीत काही जागांवर कॉंग्रेस व राकॉंची युती होऊ शकते तर शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभे करेल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडीचा चेंडू आता मंत्रालयस्तरावरच्या कोर्टात गेला असून सोमवारपर्यंत काहीतरी निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी तुर्तास तरी अधांतरी असल्याने इच्छूक उमेदवार संभ्रमात असल्याचे दिसून येते.आघाडीचा निर्णय झाला नाही तर?राकाॅं, काॅंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांत महाविकास आघाडीबाबत निर्णय होणार की नाही? ही बाब सोमवारी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, निर्णय झाला नाही तर सर्वच जागांवर स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरविण्याची तयारीही प्रमुख पक्षांनी ठेवली आहे. विश्वसनीय सूत्रानुसार काॅंग्रेस व राकाॅंने गतवेळच्या विजयी जागा त्या- त्या पक्षाकडे कायम ठेवून उर्वरीत जागा आपसात वाटून घेण्याबाबतचा निर्णयही पडताळून पाहिला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. अद्याप निर्णय झाला नाही. उद्यापर्यंत काहीतरी निर्णय होण्याची आशा आहे.- चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राकॉं
जि.प. पाेटनिवडणुकीत महाविकास आघाडीबाबत सध्या काही ठोस निर्णय झालेला नसून, चर्चा सुरू आहे. सोमवारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.- अॅड. दिलीपराव सरनाईकजिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
महाविकास आघाडीबाबत कोणत्याच पक्षाचा निर्णय झाला नाही. याच मुद्याच्या अनुषंगाने उद्या मंत्रालयात बैठक होणार आहे.- सुरेश मापारी, जिल्हा प्रमुख, शिवसेना