वाशिम : जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी ‘आयबीपीएस’ कंपनीने आधी जाहीर केलेले वेळापत्रक चार दिवसांनी पुढे ढकलले आहे. आता जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात तीन पदांसाठी परीक्षा होणार असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना हाॅलतिकिट डाऊनलोड करावे लागणार आहे.
बहुप्रतिक्षेनंतर राज्यात जिल्हा परिषदेच्या जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत गट क संवर्गाची विविध १८ प्रकारातील २४२ रिक्त पदे भरण्यात येणार असून यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्चश्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी) व (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा पदांचा समावेश आहे. या पदांसाठी १२ हजार ३५२ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांमधून ज्यांना वाशिम परीक्षा केंद्र दिलेले आहे, अशा उमेदवारांना डिजिटल परीक्षा परीसर, शासकीय तंत्रनिकेतनसमोर लाखाळा वाशिम येथे पहिल्या टप्प्यात तीन पदांसाठी ७ व ८ ऑक्टोबर रोजी परीक्षा द्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेचे हाॅलतिकीट डाऊनलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली.
असे आहे परीक्षेचे वेळापत्रक -रिंगमन (दोरखंडवाला) - ७ ऑक्टोबरवरिष्ठ सहायक (लेखा) - ७ ऑक्टोबरविस्तार अधिकारी (सांख्यिकी) - ८ ऑक्टोबर
उर्वरीत पदांबाबत लवकरच माहिती -रिंगमन, वरिष्ठ सहायक (लेखा) व विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या तीन पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले. उर्वरीत पदांच्या परीक्षेबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.