शेलूबाजार : मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंप्री अवगण येथील शाळेत गेल्या १४ दिवसांपासून खिचडीच शिजली नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. शासनाच्या पोषण आहारापासून हे विद्यार्थी वंचित राहिले आहेत. मात्र, शिक्षण विभागाला याची माहितीच नसल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे.
मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पिंप्री अवगण येथील जिल्हा परिषद शाळेला शालेय पोषण आहारांतर्गत मिळणाऱ्या तांदळाचा साठा 4 जुलै रोजी संपला. त्यानंतर संबंधितांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर माहिती देऊन किंवा नियमानुसार तजवीजकरून पोषण आहार सुरु ठेवणे आवश्यक होते. परंतु, ४ जुलै रोजी साठा संपल्यानंतर १४ जुलैपर्यंतही याची दखल कोणी घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शाळेत खिचडी शिजवल्या गेली नाही. शाळेतील तब्ब्ल ९३ विद्यार्थ्यांची या हलगर्जीपणामुळे उपासमार झाली आहे. तब्बल १४ दिवसानंतर काही पालक व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी १४ जुलै रोजी मुख्याध्यापकांशी चर्चा केल्यावर पं.स.कडून मिळणारे पोषण आहार मिळाले नसल्यानेच खिचडी शिजविण्यात आली नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
सुरेश निकम - मुख्याध्यापक जि.प.शाळा पिंप्री अवगणमंगरुळपीर पंचायत समितीमधील शालेय पोषण आहार विभागाकडे तांदळाची व तूर डाळेची मागणी केली होती. त्यापैकी ३५ किलो तूर डाळ १२ जुलै रोजी प्राप्त झाली; परंतु तांदूळ न मिळाल्याने खिचडी शिजविण्यात अडचण येत आहे.
श्रीकांत माने - शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. मंगरुळपीरशालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा पुरवठा झाला नसल्याने काही शाळांत अडचण येत आहे. तथापि, मुख्याध्यापकांनी यासाठी स्वत:च्या स्तरावर नियोजन करून खिचडी शिजविणे आवश्यक होते. आता वरिष्ठस्तरावर तांदळाची मागणी करून अडचण दूर करण्यात येईल.