वाशिम, दि. २0-विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद लेखा संवर्गीय कर्मचार्यांनी १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलन पुकारल्याने वाशिम जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची देयके रखडली आहेत. अद्यापही आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने रखडलेल्या देयकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लेखा कर्मचार्यांना राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणे ग्रेड पे वरिष्ठ सहायक लेखा कर्मचार्यांना ४00 रुपये व सहायक लेखा अधिकारी यांना १00 रुपये वाढवून मिळावा, ग्रेड पे राज्य शासन कर्मचार्यांना ज्या दिनांकापासून मंजूर करण्यात आला, त्या दिनांकापासून मंजूर करण्यात यावा व यात झालेला भेदभाव संपुष्टात आणावा, जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयाप्रमाणे गट स्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लेखा संवर्गातील संपूर्ण कर्मचारी लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे विविध विभागांची देयके, लेखाविषयक कामकाज ठप्प आहे. आंदोलनावर लवकर तोडगा निघाला नाही तर मोठय़ा प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलनाला सुरूवात करण्यात आले. मार्च एन्डिंग असतानाही लेखा कर्मचारी उपलब्ध नसल्याने विविध प्रकारची देयके तपासणी व मंजुरीच्या कामाला ब्रेक लागत आहे. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे लेखाविषयक कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान, या आंदोलनाला जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. लेखा संवर्गातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वाशिमचे अध्यक्ष रामानंद ढंगारे यांनी दिली.
जिल्हा परिषदेची विविध देयके रखडली!
By admin | Published: March 21, 2017 3:05 AM