वाशिम : काेराेना संसर्ग पाहता ३० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात सुरू असलेले बार, वाईन शाॅपच्या वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत. परंतु लाेकमतने १८ जानेवारी राेजी रात्रीच्या दरम्यान पाहणी केली असता या वेळेचे अनेकजण बंधन पाळत नसल्याचे दिसून आले.
काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही नियम, अटी व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून वाईन शाॅप, बिअर शाॅप सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत तर परमिट रूम सकाळी ११.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वेळ निर्धारित करण्यात आली आहे. तसेच देशी दारूची दुकाने सकाळी ८ वाजता उघडून रात्री १० वाजेपर्यंत बंद करण्याची वेळ आहे. परंतु लाेकमतच्यावतीने १८ जानेवारी राेजी रात्री शहरातील व शहराबाहेरील काही वाईन बारची पाहणी केली असता काहींनी वेळेवर तर काहींनी बाहेरून दरवाजा बंद करून आतून दुकाने सुरू ठेवल्याचे दिसून आले. यामध्ये वाशिम शहरातील पुसद नाका, अकाेला रस्ता, हिंगाेली राेड, रिसाेड राेडवरील प्रतिष्ठानांचा समावेश आहे. दरवाजा बंद असल्यानंतरही चाैकीदाराला सांगून दरवाजा उघडून ग्राहकांना आत घेण्याची व्यवस्था काही ठिकाणी दिसून आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नियमित कारवाई हाेत असल्याने बंद दारामागे काही जण व्यवसाय करीत असल्याचे चित्र दिसून आले.
.................
शहरातील हॉटेल १
वाशिम शहरातील पुसद नाक्यावर असलेले वाईन बार, बिअरबार रात्री उशिरापर्यंत उघडी असल्याचे दिसून आले. यामध्ये मंगरुळपीर, हिंगाेली रस्त्यावरील ४ जणांचा समावेश आहे
.................
शहरातील हॉटेल २
वाशिम शहरातील रिसाेड रस्त्यावर व अकाेला रस्त्यावरील ३ वाईन बार रात्री उशिरापर्यंत उघडे असल्याचे दिसून आले. शहरात असलेले वाईन शाॅप मात्र वेळेत बंद झाल्याचे दिसून आले.
..........
शहराबाहेरील हॉटेल १
अकाेला रस्त्यावर सर्वाधिक वाईन बार, बिअर शाॅपी आहेत. काही जणांकडे दारूविक्रीचा परवाना नसतानासुद्धा विक्री केली जातेय, या रस्त्यावरील ४ ठिकाणी उशिरा विक्री झाली.
...........
शहराबाहेरील हॉटेल २
वाशिम-मंगरुळपीर रस्त्यावर शहराबाहेर असलेले ४ वाईन बार व बिअर शाॅपी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. हे नेहमीच रात्री उशिरा सुरू असल्याचीही माहिती आहे.
...........
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय?
अबकारी अनुज्ञप्त्यांना ५० टक्के क्षमतेनुसार निर्धारित वेळेनुसार काेविड १९ संदर्भात वेळाेवेळी जाहीर केलेल्या अटी, शर्ती व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून बार, वाईन शाॅप सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.
एफएल ३ (परमिट रूम) सकाळी ११.३० ते रात्री १०, वाईन शाॅप, बिअर शाॅप सकाळी १० ते रात्री १०, देशी दारू सकाळी ८ ते रात्री १० वाजपर्यंत वेळ निधार्रित केली आहे.
............
निर्धारित वेळेत वाईन शाॅप, बार बंद करण्याच्या सूचना सर्व
आस्थापना, बारमालकांना
देण्यात आल्या आहेत.
याकरिता सतत पथक फिरून
याची पाहणीसुध्दा केली जाते.
वेळेनंतर सुरू असलेल्या बिअरबार, शाॅपीवर कारवाई करून दंडसुध्दा आकारण्यात आला आहे.
-अतुल कानडे
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वाशिम