ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. २१ : जिल्हा परिषद विषय समिती निवडणुकीत काँग्रेस-राकाँ युतीने वर्चस्व कायम राखले असून, सेनेच्या विश्वनाथ सानप यांना कृषी व पशुसंवर्धन समितीवर समाधान मानावे लागले. अर्थ व बांधकाम समिती कायम राखण्यात राकाँचे चंद्रकांत ठाकरे यशस्वी झाले असून, शिक्षण व आरोग्य समिती काँग्रेसचे सुधीर गोळे यांच्याकडे गेली आहे. या निवडणुकीत भाजपाच्या सहा सदस्यांसह एकूण १० सदस्य गैरहजर राहिले.
मिनि मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, भारिप-बमसं तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असे पक्षीय बलाबल आहे. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने विषय समिती सभापती पदासाठी ८ जुलै रोजी निवडणूक होऊन, यामध्ये सुधीर गोळे (काँग्रेस), पानुताई जाधव (राकाँ), यमुना जाधव (काँग्रेस) व विश्वनाथ सानप (शिवसेना) अशा चार सदस्यांची वर्णी लागली होती. अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन या विषय समितीचे वाटप करण्यासाठी २१ जुलै रोजी जिल्हा परिषद सभागृहात मतदान घेण्यात आले.
सुरूवातीला कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी सेनेचे विश्वनाथ सानप यांना २९ मते मिळाल्याने ते विजयी झाले तर सुधीर गोळे व चंद्रकांत ठाकरे यांना शून्य मतदान झाले. अर्थ व बांधकाम समिती निवडणुकीत राकाँचे चंद्रकांत ठाकरे यांना २९ मते मिळाल्याने ते विजयी झाले तर सुधीर गोळे व विश्वनाथ सानप यांना शून्य मतदान झाले. शिक्षण व आरोग्य समिती निवडणुकीत काँग्रेसचे सुधीर गोळे यांना २९ मते मिळाल्याने ते विजयी झाले तर चंद्रकांत ठाकरे व विश्वनाथ सानप यांना शून्य मतदान झाले.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचे सहा सदस्य, राकाँचे दोन सदस्य आणि अन्य दोन असे एकूण १० सदस्य गैरहजर राहिले. जि.प. अध्यक्षांसह एकूण ४१ जण मतदान प्रक्रियेवेळी उपस्थित होते. भाजपाचे सर्वच सदस्य गैरहजर का राहिले? याबाबत उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.