संतोष वानखडे / वाशिमखासगी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ह्यहायटेकह्ण करण्यावर शिक्षण विभागाने भर दिला आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात जवळपास ८0 शाळांसाठी ८0 लाखांची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असतो, ही ओरड नेहमीच होत आली आहे. शिक्षकांची कमतरता, शाळांमध्ये भौतिक सुविधा व डिजिटल क्लासरूमचा अभाव, यासह अन्य काही कारणांमुळे पालकांचा कल आपसूकच खासगी शाळांकडे वाढला. हे चित्र बदलविण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्व शिक्षा अभियान यासह अन्य उपक्रमांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा व डिजिटल क्लासरुमला प्राधान्यक्रम दिला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठय़ा संख्येने शिक्षणाचे धडे गिरवावे, या उद्देशातून वाशिम जिल्ह्यातही गत दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांना ह्यडिजिटल क्लासरूम व बोलक्या भिंतीह्णची जोड मिळत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत ७७४ प्राथमिक शाळा आहेत. गतवर्षी जिल्ह्यात लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या जवळपास १३0 शाळेत ह्यडिजिटल क्लासरूमह्ण हा उपक्रम साकारला. यावर्षी शाळेला सुरुवात होताच, वर्गखोल्या ह्यहायटेकह्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने वाशिम जिल्ह्यासाठी जवळपास ८0 लाखांची तरतूद केल्याची माहिती हाती आली आहे. यामधून संगणकीकृत शिक्षणासाठी २0 वर्गखोल्या, तर ह्यएलईपीह्ण कार्यक्रमांतर्गत ६0 वर्गखोल्यांची निवड केली जाणार आहे. संगणकीकृत शिक्षणासाठी २0 लाख आणि एलईपी (लर्निंग इन्चान्टमेंट प्रोग्राम) अंतर्गत ६0 शाळेसाठी ६0 लाख, असा एकूण ८0 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाणार आहे. २0 शाळा डिजिटल आणि उर्वरित शाळांमध्ये भाषा विषयात कौशल्य मिळविण्यासाठी विविध बोलके उपक्रम, कृतियुक्त अध्ययनावर भर देणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे, शाळेच्या भिंती बोलक्या बनविणे, विद्यार्थ्यांसाठी खेळ साहित्य उपलब्ध करणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक मनोरंजनात्मक व हसतमुख बनविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आदी उपक्रम या निधीमधून साकारले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
जि.प. शाळा होणार ‘हायटेक’!
By admin | Published: July 04, 2016 1:54 AM