वाशिम : शेतपाणंद रस्त्यांसाठी स्वउत्पन्नातून स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करण्याचा संकल्प वाशिम जिल्हा परिषदेने बुधवार, २४ जानेवारीला सत्यात उतरविला आहे. ‘उन्नती शेतपाणंद रस्ते’ या नव्याने अर्थसंकल्पात २ कोटी ६० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. विविध मार्गाने प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून करावयाच्या खर्चाचा विभागनिहाय ताळमेळ बसवत अर्थ सभापती सुरेश मापारी यांनी सलग तिसऱ्यांदा सन २०२४-२५ या वर्षांतील जिल्हा परिषदेचा १५.१२ कोटी रुपयांच्या मूळ तरतुदींचा अर्थसंकल्प बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहासमोर मांडला आणि साधक-बाधक चर्चेनंतर सभागृहाने एकमताने अर्थसंकल्पाला मंजूरी दिली.
जिल्हा परिषदेला विविध मार्गाने येणारे उत्पन्न १५ कोटी १२ लाख ४९ हजार १६५ रुपये गृहित धरले असून, १५ कोटी ११ लाख ९७ हजार ५९० रुपये खर्चाची तरतूद केल्याने, सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाकरिता ५१ हजार ५७५ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प ठरला. स्थानिक जि.प. वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष चंदकांत ठाकरे होते. मंचावर उपाध्यक्ष चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सभापती सर्वश्री सुरेश मापारी, वैभव सरनाईक, अशोक डोंगरदिवे, वैशाली प्रमोद लळे, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा डीआरडीएचे प्रकल्प संचालक किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे आदींची उपस्थिती होती. शेतात जाण्यासाठी खडीकरणाचे पाणंद रस्ते नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. पाणंद रस्त्यांअभावी कोणाची पेरणी खोळंबते तर कोणाला शेतातून शेतमाल घरी आणता येत नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याशी संबंधित पाणंद रस्त्यांसाठी शासनाकडून स्वतंत्र हेडखाली निधी मिळत नसल्याने पाणंद रस्त्यांचा प्रश्न धगधगता आहे. पाणंद रस्त्यांचा प्रश्न काही अंशी निकाली काढण्यासाठी तसेच पाणंद रस्त्यांबाबत शासनाकडे ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ठोस भूमिका घेतली आहे. बुधवारी मंजूर झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात ‘उन्नती शेतपाणंद रस्ते’ या नावाने स्वतंत्र हेड तयार करून २ कोटी ६० लाखांच्या निधीची तरतूद केली. स्वउत्पन्नातून पाणंद रस्त्यांसाठी निधीची तरतूद करणारी वाशिम जिल्हा परिषद विदर्भात पहिली ठरल्याच्या प्रतिक्रिया जिल्हा परिषद वर्तुळातून उमटत आहेत.
असे मिळणार उत्पन्न
सुरूवातीची शिल्लक - ५.४२ कोटीशासनाकडून उपकरातून प्राप्त उत्पन्न - १.६० कोटीगुंतवणुकीतून प्राप्त व्याज - ७ कोटीस्वउत्पन्न /इतर जमा - १.१० कोटीएकूण - १५.१२ कोटी
कोणत्या विभागासाठी किती तरतूद?
विभाग/ तरतूदबांधकाम /३.०२ कोटीशिक्षण /८७.५१ लाखपाणीपुरवठा / ५० लाखआरोग्य /७८ लाखसमाजकल्याण / ५२.१२ लाखमहिला व बालकल्याण / ४२.२७ लाखकृषी विभाग / ५० लाखपशुसंवर्धन / ४० लाखसामान्य प्रशासन /२.४५ कोटीपंचायत / ३ कोटीवित्त / ३० लाखलघुसिंचन / १.८० कोटीदिव्यांग कल्याण / ४८.५० लाखआदिवासी कल्याण /५२.१२ लाख
एकूण / १५.११ कोटी