WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पुन्हा रिंगमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे अंडरटेकरनं स्पष्ट केले. WWEनंही या वृत्ताला दुजोरा दिला. 1990मध्ये त्यानं WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं. मार्क विलियम कॅलवे असे त्याचं खरं नाव आहे. अंडरटेकर त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या WrestleMania 36 सामन्याचे चित्रिकरणासाठी जात होता. पण त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचा मोठा भाऊ टिमॉथी याचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले.
Last Ride seriesच्या सामन्याच्या चित्रिकरणाच्या आदल्या दिवशी अंडरटेकरला भावाच्या निधनाची बातमी समजली. बोनयार्ड येथे सामन्याचे चित्रिकरण होणार होते आणि तेव्हा त्याला भाचीनं फोन केला. तिनं अंडरटेकरला त्याच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी दिली. अंडरटेकरचा भाऊ 63 वर्षांचा होता.
अंडरटेकरनं सांगितलं की,''अखेरच्या सामन्यासाठी जाताना मला Voicemail मॅसेज आला आणि त्यात भाचीनं तिचे वडील आणि माझ्या भावाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. भावाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, असे मी तिला विचारले. तिनं मला सांगितले नाही त्यांचे निधन झाले आहे. WrestleManiaचा सामन्याचे चित्रिकरण संपवून मी माझ्या सर्व भावंडांना आणि आईला फोन करून ही दुःखद बातमी सांगितली.''
तो पुढे म्हणाला,''भावाचं निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रिकरणाला जाताना पाय जड झाले होते. ती माझ्या कारकिर्दीतील अखेरची मॅच होती आणि सर्वांचे लक्ष माझ्यावर केंद्रीत होते. रिंगमधील फाईटपेक्षा माझ्या मनात वेगळीच फाईट सुरू होती.'' अंडरटेकरच्या अखेरच्या सामन्याचे चित्रिकरण 8 तास चालले.