मुंबई : सध्याच्या घडीला डब्ल्यूडब्ल्यूइमध्ये सर्वात जास्त नाव चर्चेत आहे ते कोफी किंग्स्टन. कारण या वर्षात कोफी किंग्स्टनने डब्ल्यूडब्ल्यूइमध्ये सर्वाधिक यश मिळवले आहे. त्यामुळे चॅम्पियन हा किताब त्याला मिळाला आहे. आपल्या या यशाचे रहस्य कोफीने खास 'लोकमत'शी बोलताना उलगडले आहे.
आतापर्यंत ब्ल्यूडब्ल्यूइच्या इतिहासामध्ये कोफी हा पहिलाच दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला खेळाडू चॅम्पियन ठरला आहे. याबाबात विचारले असता कोफी म्हणाला की, " माझ्यासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. क्रीडा विश्वातील लोकांनी मला स्वीकारले आणि त्यामुळेच मी चांगली कामगिरी करू शकलो. जेव्हा मला समजले की, चॅम्पियन ठरणारा मी पहिला आफ्रिकन आहे. तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. जेव्हा मी मायदेशी परतलो, तेव्हा लोकांनी माझे भरभरून कौतुक केले. त्यांच्या डोळ्यांमध्ये माझ्या दमदार कामगिरीचा आनंद दिसत होता."
गेल्या काही वर्षांपासून कोफी हा ब्ल्यूडब्ल्यूइमध्ये खेळत आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याची कामगिरी उजळली आहे. या वर्षात तर त्याने नेत्रदीपक कामगिरी केली. या यशाचे रहस्य नेमके काय, असे विचारल्यावर कोफी म्हणाला की, " स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत केली. कधीही पराभव पत्करायचा नाही. बऱ्याच वेळा काही गोष्टींचा मिलाफ करावा लागतो. कधीही मागे वळायचं नाही. सर्वतोपरी प्रयत्न करायचे. फक्त एका यशावर समाधानी व्हायचे नाही, एका यशाच्या डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तुम्ही सर्व यशाचे डोंगर पादाक्रांत करता, तेव्हा तुम्ही चॅम्पियन ठरता."
ब्ल्यूडब्ल्यूइमध्ये खेळताना किती दडपण असते, याबाबत कोफीने सांगितले की, " रिंगमध्ये युद्ध असतंच, पण रिंगच्या बाहेरही युद्ध असतं. त्यामुळे या दोन्हीसाठी तुम्हाला तयार रहावं लागतं. प्रत्येक गोष्टीसाठी तयार रहावं लागतं. कधी काय होईल, सांगता येत नाही. तुमच्यावर सर्व विश्वाचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांचे मनोरंजन करणे, हे माझे काम असते. चाहत्यांकडून आम्हाला उर्जा मिळते आणि त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकतो."
तुझ्या अंगावर जे टॅटू आहेत, त्यांमधून तुला काहीतरी संदेश द्यायला आहे. याबद्दल तू काय सांगशील, " माझ्या आयुष्याचा संघर्ष हे टॅटू सांगत आहेत. मी आयुष्यामध्ये कसा घडत गेलो, हे या टॅटूच्या माध्यमातून मला सांगायचे आहे."
कोफी हा मार्शल आर्ट्स शिकलेला आहे. या मार्शल आर्ट्सचा ब्ल्यूडब्ल्यूइमध्ये खेळताना किती फायदा झाला, असे विचारले असता तो म्हणाला की, " मार्शल आर्ट्स चॅम्पियन होण्यात महत्वाचा वाटा होता. मार्शल आर्ट्सचा खेळात मोठा फायदा झाला. जेव्हा रिंगमध्ये कठीण प्रसंग आला तेव्हा मी मार्शल आर्ट्सचा वापर केला आणि मला यश मिळत गेले. माझ्यासाठी हे खास आहे."
कोफी तू सध्याच्या घडीला चॅम्पियन आहेस. पण तु तुझ्या मुलाला पण या क्षेत्रात आणू इच्छितोस का आणि त्याला तू काय संदेश देशील, असे विचारल्यावर तो म्हणाला की, " हो नक्कीच, मी त्याला या क्षेत्रात यायला सांगेन. पण त्यापूर्वी मी त्याचे मत लक्षात घेईन. त्याचबरोबर या क्षेत्रात किती मेहनत, उर्जा लागते, हेदेखील सांगेन. तुम्हाला सहजासहजी सारं काही मिळत नाही, त्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्यागही करावा लागतो, हे नक्कीच मी त्याला सांगेन."