सोनखास (यवतमाळ): वेळ रात्री १०:३० वाजताची. गाव झोपण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी एका घरातून आगीचे लोळ उठले. पाहता पाहता या घरातील १०० क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान यामध्ये झाले. ही घटना शनिवारी रात्री उत्तरवाढोणा (ता.नेर) येथे घडली. विशेष म्हणजे, मक्त्याने केलेल्या शेतातून पिकविलेला हा कापूस होता.
उत्तरवाढोणा येथील शोभा प्रभाकर धांदे या महिलेने बबन शेंडे यांचे १८ एकर शेत मक्त्याने घेतले होते. त्यात कपाशीची लागवड केली. त्यांना चांगला कापूसही झाला. दर वाढण्याच्या आशेने त्यांनी कापूस राखून ठेवला. शंभर क्विंटलच्या वर असलेला कापूस त्यांनी अतुल रायकुवार यांच्या घरी ठेवला होता. शनिवारी रात्री अचानक कापसाची गंजी पेटली. घरातून धूर निघायला लागल्याने नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली. मिळेल त्या साधनाचे आधारे आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
या घटनेत पूर्ण कापूस जळून राख झाला. शिवाय घरातील साहित्याचाही कोळसा झाला. सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान या घटनेत झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पांढरे सोने जळून खाक झाल्याने या शेतकरी महिलेपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.