लाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंद पुकारला होता. शेतकऱ्यांनीच पुकारलेल्या या भारत बंदमुळे शेतकऱ्यांच्याचा मालाचा लिलाव होणाऱ्या जिल्ह्यातील १६ बाजार समित्यांमधील ११ कोटींची उलाढाल थांबली होती. जिल्ह्यातील सोळाही बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, गहू या प्रमुख शेतमालाची विक्री होत आहे. भारत बंद असल्याची माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती. यामुळे शेतकरी शेतमाल विक्रीच्या तयारीत होते. कापसाची गाडी सोमवारी भरलेल्या शेतकऱ्यांना बंदमुळे मंगळवारीही शेतमाल विक्रीकरिता येताच आले नाही. मालवाहू गाडीमध्ये भरलेला कापूस असल्याने शेतकऱ्यांना त्या वाहनाचा नाईट चार्ज द्यावा लागला. त्यानंतर बुधवारी शेतमाल बाजार समितीमध्ये पोहोचला. अशीच अवस्था सोयाबीन आणि तूर उत्पादकांची झाली होती. घरातील शेतमाल विक्रीसाठी मालवाहू गाडी दारासमोर उभी होती. मात्र ऐनवेळी अडत्यांनी शेतमाल न आणण्याच्या सूचना दिल्या. यामुळे मालवाहू वाहनाचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांवर पडला. दरदिवसाला बाजार समित्यांमध्ये कापसाची आणि सोयाबीनची ११ कोटी रुपयांची उलाढाल होते. ही उलाढाल मंगळवारी थांबली होती. याशिवाय हमाल आणि मापारी यांचाही या दिवसाचा रोजगार बुडाला. याशिवाय भाजी मंडी बंद असल्याने शेतकऱ्यांना आणलेला शेतमाल गावपातळीवरच विकावा लागला. सध्या बाजारामध्ये कापूस विक्रीसाठी शासकीय कापूस संकलन केंद्राकडे शेतकऱ्यांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळत आहे. फोन काॅल प्रक्रियेमुळे शेतकरी एक दिवस आधीच तयार असतो. संपामुळे शेतकऱ्यांचे हे नियोजन कोलमडले आणि त्यांना अतिरिक्त वाहन चार्ज द्याव लागला.
११ कोटींचा व्यवहार ठप्प बाजार समितीमध्ये सध्या कापसाची सर्वाधिक आवक आहे. जिल्ह्यातील तीन केंद्रांवर असलेल्या नऊ जिनिंगमध्ये कापसाची खरेदी होत आहे. दरदिवसाला दोन हजार क्विंटलच्यावर कापूस विक्रीसाठी येत आहे. याशिवाय दहा हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीच्या यार्डमध्ये मोजल्या जात आहे. तूर, गहू आणि जुना हरभरा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येत आहे. नवीन शेतमाल येताच दर पडतील यामुळे शेतमालाची साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे. यातून ११ कोटींचा व्यवहार ठप्प झाला आहे.
बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भोजनाची आणि वेळ पडला तर निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तत्काळ चुकारे अदा करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय धान्याच्या सुरक्षेसाठी समितीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. - रवींद्र ढोक, सभापती, यवतमाळ बाजार समिती.
बंदमुळे कापूस विकण्याचे नियोजन कोलमडले. भरलेली कापूस गाडी घरीच दारासमोर उभी ठेवावी लागली. यामुळे वाहन चालकांनी मुक्कामाचे शुल्क घेतले. याशिवाय एक दिवस अधिक उशीर झाला. यामुळे देवाणघेवाणीचे व्यवहार प्रभावित झाले. संपाची माहिती नसल्याने गोंधळ उडाला. - अनुप चव्हाण, शेतकरी
शेतामध्ये भाजीपाला लावला आहे. शेतमाल विक्रीसाठी रुटीन कामकाज सुरू असते. सर्व व्यवहार बंद असले तरी भाजी मंडी सुरू राहते. यामुळे भाजीपाला तोडण्यात आला होता. मात्र बंदमुळे हा भाजीपाला भाजी मंडीपर्यंत नेता आला नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून गावातच भाजी विकावी लागली. - संतोष चव्हाण, शेतकरी