यवतमाळ : सोशल मीडियावर आलेली जाहिरात पाहून एका युवकाने व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वत: संपर्क क्रमांकावर फोन करून नंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरला. इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनसाठी हा युवक प्रयत्न करीत होता. मुंबई येथे जाऊन खातरजमा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र, तोपर्यंत त्याने १० लाख ६५ हजार रुपये विविध बँक खात्यात जमा केले होते.
सध्या इलेक्ट्रीक दुचाकी व चारचाकीचा वापर वाढत आहे. त्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन यातून चांगला व्यवसाय मिळू शकतो. हीच शक्यता पाहून संदीप मधुकर गायकवाड वाॅर्ड क्र. २ महागाव या युवकाने इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनसाठी प्रयत्न केले. त्याने सुरुवातीला २० हजार रुपये जमा केले. नंतर त्याला बीपीसीएल ईव्ही यासाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्याचे चार्जिंग स्टेशन देण्यापूर्वीच्या प्रक्रिया करण्याकरिता वेळोवेळी पैसे मागण्यात आले.
संदीप गायकवाड यानेही पदरमोड करून बँकेतून पैसे काढून संबंधिताने सांगितलेल्या खात्यात जमा केले. मात्र, अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळणे कमी झाल्याने संदीपला संशय आला. त्याने ठगाकडून सांगण्यात आलेल्या पत्त्यावर मुंबईला जाऊन खातरजमा केली. तेथे मात्र बीपीसीएल ईव्ही या कंपनीचे कार्यालयच मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संदीपने महागाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी कलम ४१९, ४२० भादंवि सहकलम ६६ ड माहिती तंत्रज्ञान कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.