शॉर्टसर्किटने आग : नागरिकांनी केले आग विझविण्याचे प्रयत्न वणी : शहरातील मदिना मस्जीद चाळीतील एका मोबाईल शॉपीला शुक्रवारी रात्री १.३० च्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. या घटनेत ११ लाखांचे मोबाईल जळून खाक झाले. मदिना मस्जीद चाळीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून बशीरभाई जहीर उद्दीन यांचे मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. रात्री १.३० च्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याची माहिती कळताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानाचे शटर उघडले असता आग लागल्याचे दिसून आले. दुकानातील संपूर्ण मोबाईलचा स्फोट होत होता. या आगीत संगणक, लॅपटॉप, रिपेरींगसाठी आलेले ७०० मोबाईल, विक्रीसाठी ठेवलेले १०० नवीन मोबाईल, स्पेअर पार्ट, इर्न्व्हटर व बॅटरी संपूर्ण जळून खाक झाली. या आगीमध्ये दुकानातील एकही वस्तू सुरक्षित राहिली नाही. १० ते ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या आगीची माहिती होताच नागरिकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाचे प्रमुख जाधव यांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. मोबाईल शॉपीचे मालक बशीरभाई जहीर उद्दीन यांनी पोलिसात तक्रार दिली असून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वणीत ११ लाखांचे मोबाईल खाक
By admin | Published: August 14, 2016 12:46 AM