यवतमाळ : शहरामध्ये वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ११ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांकडून पाच लाख २५ हजार रुपये किमतीच्या वाहनांची जप्ती करण्यात आली. यात मोटारसायकल चोरीचे इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
संदीप मंगलमजवळ उभी असलेली मोटारसायकल चोरीला गेल्याची फिर्याद रुपराव पोहेकर यांनी दिली होती. या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी कलम ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद केला आणि तपास हाती घेतला. या प्रकरणात पेट्रोलिंगवर असताना खबऱ्याकडून तक्रारीमधील मोटारसायकल चहा टपरीवर उभी दिसली. आरोपीचा शोध घेत पथक गुन्हेगारापर्यंत पोहोचले. श्रीकृष्ण ऊर्फ शिऱ्या सोळंकी याला अटक करण्यात आली.
शिऱ्या हा कळंबमधील शिवाजी चौकात वास्तव्याला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आपल्यासोबत सुरेश ऊर्फ दत्ताराव सुरोशे (रा. करंजी) हा देखील सोबत असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींकडून बाभूळगाव, यवतमाळ आणि इतर ठिकाणावरून चोरीला गेलेल्या ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याची किंमत पाच लाख २५ हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संपतराव भोसले, अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे, पोलिस अंमलदार रवी आडे, गजानन दुधकोहळे, रुपेश ढोबळे, सुरज शिंदे, अविनाश ढोणे, प्रशांंत राठोड, बबलू पठाण यांनी ही कारवाई पूर्ण केली.