यवतमाळ : जिल्ह्यात मंगळवारी केवळ ११ नवे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात १५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. विशेष म्हणजे, सलग सहाव्या दिवशी एकही मृत्यू नोंदविला गेला नाही.
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बाभूळगाव येथील दोन, दिग्रस एक, घाटंजी दोन, नेर दोन, पांढरकवडा एक, राळेगाव एक व वणी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार मंगळवारी एकूण १००५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११ पॉझिटिव्ह तर ९९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ६२ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार ६५६ झाली आहे. तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७० हजार ८०८ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १७८६ मृत्यूंची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख ७४ हजार ७९७ चाचण्या झाल्या. त्यापैकी सहा लाख दोन हजार १०५ निगेटिव्ह आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १०.७७ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.०९ आहे, तर मृत्युदर २.४६ इतका आहे.