धारणी ते करंजी : दुर्गम क्षेत्र, धार्मिक-पर्यटन स्थळांना जोडणार यवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता धारणी ते करंजी या दुर्गम, धार्मिक व पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३१५ किलोमीटरच्या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षणही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आतापर्यंत तीन स्तरावर झालेल्या सर्वेक्षणात हा महामार्ग ‘फिजीबल’ (होण्यायोग्य) असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. धारणी ते करंजी असा ३१५ किलोमीटरच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. मात्र हा महामार्ग करता येऊ शकतो का यासाठी सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले. धारणीवरून सुरू होणारा हा महामार्ग परतवाडा, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, जोडमोहा, मोहदा, उमरी, करंजी असा राहणार आहे. बीआरटी अर्थात बॅकवर्ड-रिलिजीएस-टुरिस्ट या योजनेतून या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या माध्यमातून मागासक्षेत्र, धार्मिक क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र जोडले जाणार आहे. आतापर्यंत मागासक्षेत्र व धार्मिक क्षेत्राच्या दृष्टीने सर्वेक्षण झाले आहे. त्यात धारणी ते करंजी हा राष्ट्रीय महामार्ग होण्यास योग्य आहे असा निष्कर्ष काढला गेला आहे. आता पर्यटनाच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू असून ते अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. ३१५ किलोमीटरच्या या महामार्गाचे बजेट सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यातून हा ११० किलोमीटरचा महामार्ग जात आहे. या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ आणि ७ सुद्धा जोडला जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात या महामार्गासाठी सुमारे ३०० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. काही वनजमीनही या मार्गाच्या निर्माणात येणार असली तरी त्याच्या मंजुरीत हा महामार्ग अडकणार नसल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी हा महामार्ग घाट सरळ करून पूर्ण केला जाऊ शकतो. (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळात दोन रेल्वे उड्डाण पूल या राष्ट्रीय महामार्गासाठी यवतमाळातूनही ढुमणापूरपासून उजवीकडे बायपास काढला जाणार आहे. त्यावर दोन रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल प्रस्तावित केले जाणार आहे. पुढे रुंझा ते मोहदा दरम्यान बायपास आहे. परंतु तो राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचा नसल्याने तेथे दुसरा बायपास केला जाणार असल्याची माहिती आहे. नेर बायपासवरुन राजकीय ओढाताण यवतमाळ जिल्ह्यात धारणी ते करंजी या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात तीन प्रमुख बायपास येणार आहे. त्यातील एक बायपास दिग्रस विधानसभा मतदारसंघातील नेर शहराचा आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने अमरावतीकडून नेरकडे येताना डाव्या बाजूला सहा किलोमीटरचा बायपास प्रस्तावित केला आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीलासुद्धा तोच बायपास योग्य वाटतो. परंतु तेथील राजकीय इच्छाशक्ती वेगळेच सांगते आहे. राजकीय नेत्यांना हा बायपास अमरावतीवरून नेरकडे येताना उजव्या बाजूला हवा आहे. हे अंतर किमान दहा किलोमीटरचे राहील. एका दाटीवाटीच्या वस्तीमागून हा बायपास जाणार आहे.
११० किमी राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण
By admin | Published: August 04, 2016 12:50 AM