यवतमाळ : न्यायालयाच्या निर्णयानंतर कर्मचारी कामावर रुजू होण्याची संख्या वाढली आहे. तरी अजूनही ३५ हजार २२१ कामगार कामगिरीवर दाखल झालेले नाही. त्यांच्याजवळ केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मागील नऊ दिवसात संपातून बाहेर पडून दहा हजार ८७५ कर्मचाऱ्यांनी ड्युटी सुरू केली आहे. यामध्ये चालक आणि वाहकांचीही संख्या अधिक असल्याने बसफेऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ पासून संप सुरू केला आहे. दरम्यानच्या काळात काही कर्मचारी बडतर्फी, सेवासमाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईत अडकले. शासनाने केलेले आवाहन आणि होत असलेल्या कारवाया यामुळे काही कर्मचारी कामावर हजर झाले. परंतु ही गती अतिशय संथ होती. न्यायालयाच्या ८ एप्रिल २०२२ रोजीच्या निर्णयानंतर मात्र गती वाढली. अधिक कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळात ९२ हजार कर्मचारी कार्यरत आहे. त्यातील काही लोकांवर कारवाई झाल्याने प्रत्यक्ष ८१६८३ कर्मचारी पटावर आहेत. पैकी ४३४६२ कामगार कामावर आले असून, ३५२२१ जण संपावरच आहेत. यामध्ये प्रशासकीय, कार्यशाळा कर्मचारी, चालक व वाहकांचा समावेश आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. ही परिस्थिती पाहून काही कर्मचाऱ्यांनी कामावर जाणे पसंत केले. ९ ते १७ एप्रिल या नऊ दिवसांत १०८७५ कर्मचारी कामावर आले आहेत.
८ एप्रिलपर्यंत कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३५५८७ एवढी होती. १७ एप्रिलपर्यंत ती ४६४६२ वर पोहोचली आहे. नऊ दिवसांत २६३ प्रशासकीय कर्मचारी कार्यशाळेतील १९१७, चालक ५१४४ आणि वाहक ३५५१ कामावर हजर झाले आहेत. पुढील पाच दिवसांत आणखी किती कर्मचारी कामावर येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रशासकीय ६९१ कर्मचारी बाहेर
प्रशासकीय विभागातील केवळ ६९१ कर्मचारी बाहेर आहेत. या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ११ हजार ९८९ एवढी आहे. त्यातील ११ हजार २९८ कामगिरीवर आहेत. गेल्या नऊ दिवसांत २६३ प्रशासकीय कर्मचारी कामावर आले. सुरुवातीपासूनच या कर्मचाऱ्यांचा संपातील सहभाग कमी होत गेला आहे.