१४ अपहृत बेपत्ताच : २१ खून, ९२ बलात्कार, ४३३ विनयभंग, १०५ अपहरण सुरेंद्र राऊत यवतमाळ विवाहित महिला व मुलींवरील अत्याचाराचे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १ हजार १०५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात विनयभंगाच्या सर्वाधिक ४३३ गुन्ह्यांचा समावेश आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या ११ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ३० पोलीस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराचे हे गुन्हे दाखल झाले आहेत. तब्बल २१ महिलांचे खून तर २५ महिलांच्या खुनाचा प्रयत्न केला गेला आहे. २३ महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले आहे. माहेरहून पैसे आणू न शकलेल्या १६ महिला हुंडाबळी ठरल्या आहेत. सासरच्यांकडून त्यांचा बळी गेला आहे. पती व सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाचे २३७ गुन्हे नोंदविले गेले. ४३३ महिला-मुलींच्या विनयभंगाची नोंद पोलीस दप्तरी घेतली गेली. ९२ महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहे. जिल्ह्यातून १०५ महिला व मुलींचे अपहरण झाले असून त्यातील १४ महिलांचा अद्यापही पोलिसांना शोध लावता आलेला नाही. त्यांचे अपहरण झाले मात्र कुणी केले व कशासाठी केले, आज नेमक्या त्या कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागलेला नाही. महिलांना अश्लील शिवीगाळ व हावभाव करण्याचे १५३ गुन्हे नोंदविले गेले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सन २०१४ च्या तुलनेत सन २०१५ मध्ये ४०४ ने घटल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, छळ, विनयभंग, बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येते. विवाहितांना आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडाबळी या गुन्ह्यांच्या प्रकारात अनुक्रमे ५ व ८ ने वाढ झाली आहे. दाखल गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ९९ टक्के असल्याचा पोलिसांचा दावा आहे. महिला तक्रार निवारण कक्षाला यशसासरच्यांकडून होणाऱ्या छळाची तक्रार घेऊन विवाहिता पोलीस ठाण्यात गेल्यानंतर थेट गुन्हा नोंदविला जात नाही. या विवाहितेला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविले जाते. तेथे संसार तुटू नये, गैरसमज दूर व्हावे म्हणून समूपदेशन केले जाते. पती, पत्नी व तिच्या नातेवाईकांची समजूत घातली जाते. या माध्यमातून या केंद्राने अनेक तुटणारे संसार वाचविले आहे. आजही हे संसार सुखा-समाधानाने सुरू आहेत. गेल्या वर्षभरात अशा ५० महिलांचे यशस्वीपणे समूपदेशन केल्याने सन २०१५ मध्ये तेवढे गुन्हे २०१४ च्या तुलनेत कमी नोंदविले गेले आहेत. दोनही बाजूच्या मंडळींना बोलावून कौटुंबिक वातावरणात समूपदेशनाचा महिला तक्रार निवारण केंद्राचा हा प्रयत्न यशस्वी होतो आहे. काही प्रकरणात मात्र पती-पत्नीचे नव्हे तर दोनही बाजूची मंडळी टोकाची भूमिका घेत असल्याने नाईलाजाने छळाचे गुन्हे नोंदविले जातात.
महिला अत्याचाराचे ११०५ गुन्हे
By admin | Published: December 24, 2015 2:59 AM