गजानन अक्कलवार - कळंबतालुक्यात अनुसूचित जमाती व सामान्य कुंटुंबातील नागरिकांच्या इंदिरा आवास घरकूल योजनेतील साडेअकराशे घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी १० कोटी ९२ लाख ५० हजार रूपये निधी प्राप्त झाला आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या घरकुलांना मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. शासन आणि लाभर्थ्यांमध्ये सरळ व्यवहार होणार असून दलालांना चाप देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कार्यशाळा घेण्यात आली. अनुसूचीत जमातीच्या कुंटुबातील १ हजार ६५ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये कळंब (१७३), हुस्रापूर (१), सावरगाव (३), किन्हाळा (१०), दत्तापूर (१२), चापर्डा (१३), पालोती (१२) पोटगव्हाण (३), जोडमोहा (५९), अंतरगाव (३३), नांझा (८६), मुसळ (९९), चिंचोली (३), झाडकिन्ही (१२६), डोंगरखर्डा (१५२) व पहुर ईजारा (२१७) आदी गावांचा समावेश आहे. सामान्य कुंटुबातील ८५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये निभोंरा (३), शरद (६), बेलोरी (८), पाथ्रड (१२), देवनळा (१९), शिवणी (१६) व रासा (१०) आदी गावांचा समावेश आहे. घरकूल बांधकामासाठी शासनातर्फे ९५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. लाभार्थ्यांनी वैयक्तीक ५ हजार रूपये बांधकामासाठी वापरावयाचे आहे. अनुदानाचा पहीला हप्ता ३५ हजार रूपयांचा राहणार असून यामध्ये जोता व लेंटरपर्यंत बांधकाम करावयाचे आहे. दुसरा हप्ताही ३५ हजाराचा असून यामध्ये भिंती उभ्या करावयाच्या आहे. घरकूल व शौचालयाचे बांधकाम झाल्यानंतर २४ हजार ३०४ रुपये तिसऱ्या हप्त्यात दिले जाणार आहे. अनेकवेळा घरकूल लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयाला चकरा माराव्या लागतात. घरकुलाचे पैसे मिळऊन देण्यासाठी गावातील दलालही सक्रिय होतात. यातून बरेचदा त्यांची फसवणूकही होते. यावर मात करण्यासाठी लाभार्थ्यांना निधी मिळविणे व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने कार्यशाळेत माहिती देण्यात आली.
११५० घरकुलांना मंजुरी
By admin | Published: June 11, 2014 12:19 AM