लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात कर्ज वाटप प्रक्रियेत बँका अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घ्यावी लागते. याच संधीचा लाभ उठवीत ११८ सावकारांनी तब्बल चार कोटींचे कर्ज वाटप केल्याचे वास्तव पुढे आले आहे.जिल्ह्यात परवानाप्राप्त सावकारांनी हे कर्ज वाटप केले आहे. मात्र अधिकृत सावकाराची संख्या अत्यल्प आहे. जिल्ह्यात अशा ११८ सावकारांनी चार कोटी रूपयांच्या कर्जाचे वितरण केले. त्यावर १८ टक्के व्याज आकारले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही पिचले जात आहे. गतवर्षी जिल्ह्यात ११५ सावकार होेते. यावर्षी त्यात तीनची भर पडून ११८ सावकारांची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक ४७ सावकार यवतमाळ तालुक्यात आहेत. घाटंजीत १८ सावकार, दारव्हा ४, पुसद १४, दिग्रस ३, नेर १२, कळंब ६, बाभूळगाव ४, पांढरकवडा ४, आर्र्णी २, महागाव ३ आणि मारेगावमध्ये एका सावकाराची नोंद करण्यात आली आहे. या सावकारांनी तीन कोटी ७२ लाख ९९ हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण केले. यामध्ये सर्वाधिक पावणे दोन कोटी रूपयांच्या कर्जाचे वितरण पुसदच्या १४ सावकारांनी केले. यवतमाळ तालुक्यातील ४७ सावकारानी ४३ लाख ८१ हजार रूपयांचे कर्ज वाटप केले आहे.वितरित केलेल्या कर्जावर सावकार १८ टक्के व्याज आकारतात. त्यात शेतकऱ्यांना तारण कर्ज नऊ टक्के दराने, तर विनातारण कर्ज १२ टक्के दराने दिले जाते. शेतकºयांव्यतिरीक्त इतर व्यक्तींना गहाण कर्ज १२ टक्के, तर विनागहाण कर्ज तब्बल कर्ज १८ टक्के व्याज दराने दिले जाते. शासकीय अध्यादेशानुुसार आकारण्यात येत असलेले हे व्याज दर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारे आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची कर्जाच्या जाचातून मुक्तताच होत नाही.अधिकृत आणि अनाधिकृत सावकारांची संख्या जिल्ह्यात सतत वाढत आहे. सावकारी पाश अधिकच गडद होत आहे. यातून शेतकरी आणि सामान्य जनतेची कधी सुटका होईल, हे सांगणे कठीण आहे.अनधिकृत वाटप कोट्यवधींच्या घरातजिल्ह्यात मोजकेच ११८ सावकार परवानाप्राप्त असल्याचे दिसून येते. त्यांनी केलेले कर्ज वाटप रेकॉर्डवर येते. मात्र अवैध सावकारांनी वाटलेले कर्ज कधीच रेकॉर्डवर येत नाही. अशा सावकारांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यांनी वाटलेले कर्जही कोट्यवधींच्या घरांत आहे. मात्र त्याची कुठेच नोंद नाही. त्यामुळे हा आकडा गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे अवैध सावकार गहाण म्हणून चक्क शेताची खरेदी करीत असल्याचेही अनेकदा उघड झाले आहे. मात्र या अवैध सावकारीला पायबंद घालण्यास यंत्रणा अपयशी ठरत असल्याने त्यांचे फावत आहे.
११८ सावकारांनी वाटले चार कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:24 PM
शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात कर्ज वाटप प्रक्रियेत बँका अपुऱ्या पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना कर्जासाठी सावकारांकडे धाव घ्यावी लागते. याच संधीचा लाभ उठवीत ११८ सावकारांनी तब्बल चार कोटींचे कर्ज वाटप केल्याचे वास्तव पुढे आले आहे.
ठळक मुद्दे१८ टक्के व्याज : सावकारांमुळे शेतकरी व नागरिक हैराण