लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: मराठा सेवा संघ प्रणित जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदद्वारा आयोजित ११ वे मराठा साहित्य संमेलन यावर्षी प्रथमच परिषदेच्या फेसबुक पेजवरून (जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. हे संमेलन २७ ते २९ जून या कालावधीत होणार आहे. यात विविध मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. २७ जून रोजी सायं ५ वा. डॉ. सरोजनी बाबर विचारपीठारून परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक राणा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल. यावेळी संमेलनाचे ऊद्धाटनपर मनोगत मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार हे करणार आहेत. या संमेलनाची भूमिका व पाहुण्यांचे स्वागत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील करणार आहेत.
२७ जून रोजी 'नैसर्गिक आपत्तीवर संत वाङमयातून व्यक्त झालेले उद्गार' या विषयावर प्रा. डॉ. छायाताई महाले आणि प्रा. डॉ. रविद्र बेंबरे हे आपले विचार मांडणार आहेत. या सत्रात अध्यक्ष मा. गंगाधरजी बनबरे हे असणार आहेत.
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २९ जून रोजी 'जागतिक महामारी कोरोनानंतर साहित्यिक व सामाजिक चळवळीवरील परिनाम व ऊपाय' या विषयावर डॉ. मनोज तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे. या विषयावर डॉ. मंजुश्री पवार व विजय चोरमारे सहभागी होतील. या सर्व कार्यक्रमाचे समारोपीय मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरूषोत्तम खेडेकर करणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचा साहित्य प्रेमींनी आस्वाद घ्यावा असे आव्हान परिषदेचे विदर्भ विभाग संघटक दत्ता डोहे यांनी केले आहे.