संतोष कुंडकर
वणी(यवतमाळ) : केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील वार्ड क्रमांक चारमधील खडकपुरा परिसरात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री १०.३० येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सुमय्या युनूस पठाण (१७) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.
सुमय्या पठाण ही विद्यार्थिनी अभ्यास करत असताना आईला सांगून घराच्या बाहेर आली. चेहऱ्याला पाणी मारून ओल्या हाताने ती तारेवर टॉवेल टाकायला गेली, असता तार वीज प्रवाहित असल्याने त्या तारेचा तिला जबर शॉक लागला. शॉक लागताच सुमय्या जोराने ओरडली. त्यामुळे तिची आई बाहेर आली असता, सुमय्या तारेला पकडून पडून होती. तिला स्पर्श केला असता आईलासुद्धा शॉक लागला. नंतर तिच्या वडिलांनी मेन स्वीच बंद करून मुलीला तारेच्या दूर केले.
आवाजाने शेजारचे लोक धावून आले. तिला स्थानिक खासगी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचार मिळाले नाही. अखेर शासकीय दवाखान्यात नेण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिला रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला आदिलाबाद येथे हलविले. मात्र वाटेतच तिचे निधन झाले. सोमवारी सकाळी १० वाजता आदिलाबाद पोलिसांनी पंचनामा केला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. दुपारी तीन वाजता सुमय्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मृत सुमय्या ही पांढरकवडा येथील मल्टी हायस्कूलची विद्यार्थिनी होती. मागील वर्षी दहावीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली होती.