यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी हे गुटखा तस्करीचे प्रमुख केंद्र आहे. येथून कारंजा-अमरावती या एका मार्गावर गुटखा पाठविला जातो. त्यात वर्षाकाठी १२ कोटींची उलाढाल होते, असे इतरही मार्ग जिल्ह्यातून तस्करीसाठी वापरले जातात. यवतमाळ मुख्यालय तर यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक व्हाईट कॉलर व प्रशासकीय सेवेतील व्यक्तीही या तस्करीच्या व्यवसायात अप्रत्यक्षपणे उतरले आहे. पारवा पोलिसांनी केलेल्या कारवाईतून आर्णीचा मेहबूब, कारंजाचा अहेमद व अमरावतीतील जावेद पुन्हा रडावर आले आहे
महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याची लगतच्या तेलंगणा व कर्नाटक या राज्यात सर्रास निर्मिती केली जाते. तेथे तयार झालेला गुटखा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात आणला जातो. आर्णीतील मेहबूब हा एकटाच महिन्याला एक कोटी रुपयांचा गुटखा वितरित करतो. पारवा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडलेला मुद्देमाल हा दहा लाखांचा आहे. महिन्याला किमान अशा दहा ट्रीप आर्णीत आणल्या जातात. तेथून कारंजा व पुढे अमरावतीकडे गुटखा पाठविला जातो. अशा अनेक साखळ्या या गुटखा तस्करीमध्ये आहेत.
गुटख्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून नफाही चौपट आहे. त्यामुळे यात अनेकजण पैसा गुंतवतात. आजपर्यंत असा पैसा गुंतविणारे कधी रेकॉर्डवर आले नाही. आयकर विभागाने गुटख्यातील काळा पैसा इतरत्र वापरणाऱ्यांचा शोध घेण्याची गरज आहे. हा पैसा काळा असल्याने तो पांढरा करण्यासाठी अनेक फंडे वापरले जातात.
पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यावर अंकुश लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुटखा तस्करीचे रॅकेट उघड केले. शेख अबरार शेख गफार, भीमराव मधुकर उईके, मो. अफताब मो. अयुब, अलताफ अफसर शेख (२०) सर्व रा, आर्णी यांना अटक केली. तर शेख गफुर, शेख मेहबूब शेख सादीक रा. शास्त्रीनगर आर्णी हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. यातील शेख मेहबूब हा या तस्करीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे विणले आहे. पारवा पोलीस सध्या शेख महेबूब याच्या मागावर असून गुटखा तस्करीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत अनेक कारवाया झाल्या. मात्र मुख्य सूत्रधारांना हात लावण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही.
तस्करीतील ईझी मनीमुळे गुन्हेगारीला चालना
गुटखा तस्करीतून येणारा ईझी मनी हा गुन्हेगारीला चालना देण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे समाजहितासाठी हे तस्करीचे जाळे मुळासकट उखडून फेकण्यासाठी सखोल कारवाईची गरज आहे. यात पोलिसांव्यतिरिक्त अन्न सुरक्षा विभाग व आयकर विभागानेही लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.