चार तालुके : शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहाने आले वास्तव पुढे रूपेश उत्तरवार यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजुरांसाठी काम उपलब्ध असल्याचे प्रशासन सांगत असले तरी त्यांच्याच अखत्यारीतील शिक्षण विभागाच्या हंगामी वसतिगृहाने मजुरांच्या स्थलांतरणाचे बिंग फोडले आहे. पुसद आणि उमरखेड उपविभागातील चार तालुक्यातून तब्बल १२०० कुटुंब रोजगाराच्या शोधात परप्रांतात गेल्याचे वास्तव पुढे आले आहे. केंद्र सरकारने रोजगार हमी योजना कायदा लागू केला आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला किमान १०० दिवस काम देण्याचा हा कायदा आहे. परंतु आजही अनेकांना काम मिळत नाही. त्यामुळे मजूर गावालगतच्या शहराकडे धाव घेतात. परंतु पुसद, महागाव, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यातील मजुरांनी शहरच नव्हे तर आपल्या प्रदेशाबाहेर कामासाठी धाव घेतल्याचे वास्तव पुढे आले आहे. शिक्षण विभागाच्यावतीने स्थलांतरित मजुरांच्या मुलासाठी हंगामी वसतिगृह चालविले जाते. या शाळांमध्ये नोंदणीकृत असलेल्या मुलांच्या संख्येवरून या चार तालुक्यातून तब्बल १२०० कुटुंब स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी असलेल्या या चार तालुक्यातील वसतिगृहात सध्या एक हजार ३४१ विद्यार्थी नोंदणीकृत आहे. त्यासाठी १२ केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे हंगामी वसतिगृह शाळेच्या नियंत्रणात चालविले जातात. येथे नोंदणीकृत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक मात्र रोजगाराच्या शोधात बाहेर गेल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. ऊस तोड, विटभट्टी आणि इतर कामासाठी या मजुरांनी मुंबई, पुणे यासह गुजरातमधील सुरत, वापी, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील विविध शहरात धाव घेतली आहे. या चारही तालुक्यातील अनेक गावात घरांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. तर काही घरात वृद्ध मंडळी तेवढी शिल्लक आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे असताना मजुरांचे स्थलांतरण रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे.
रोजगाराच्या शोधात १२०० कुटुंब परप्रांतात
By admin | Published: February 06, 2017 12:19 AM