लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जनतेच्या समस्या ऐकण्यासाठीच जनआशीर्वाद यात्रा घेऊन आलो आहे. ही यात्रा मते मागण्यासाठी नसून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी आहे, अशा शब्दात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकरी, महिला व युवकांशी संवाद साधला. यात्रेची सुरुवात दिग्रस विधानसभेतील वटफळी येथून झाली. समारोप दारव्हा येथील जाहीर सभेने होणार आहे.बुधवारी दुपारी २ वाजता नेर तालुक्यातील वटफळीमार्गे जनआशीर्वाद यात्रा जिल्ह्यात पोहोचली. तेथे ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांशी चर्चा करून ते नेर येथे आले. नेरमध्ये बाजार समिती परिसरात स्वागत झाल्यानंतर बैलबंडीतून त्यांनी मंच गाठला. या सभेतही आदित्य यांनी स्वत: काही बोलण्याऐवजी शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. राज्यात शिवसेनेचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी करू, अशी ग्वाही दिली. शिवसेनेने पीक विम्याचा मुद्दा लावून धरल्यानेच शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांची मदत मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या विधानसभेत राज्यात भगवा फडकल्यास शेतकऱ्यांचा विकास व बेरोजगारी दूर करण्याची ग्वाही देत जनतेला शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.नेर येथील जुन्या बसस्थानकावर नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल, उपनगराध्यक्ष पवन जयस्वाल, बाजार समिती सभापती रवींद्र राऊत, भाऊराव ढवळे यांनी आदित्य ठाकरेंचे स्वागत केले. यावेळी खासदार भावना गवळी, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, पंचायत समिती सभापती मनीषा गोळे, जिल्हा बँकेचे संचालक बाबू पाटील जैत, निखिल जैत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नंतर ही यात्रा यवतमाळकडे निघाली. मार्गातील कोलुरा, येलगुंडा, मालखेड खु, सोनवाढोणा, उत्तरवाढोणा, सोनखास येथे ठिकठिकाणी आदित्य यांचे स्वागत करण्यात आले. यात्रा यवतमाळातील लोहारा चौकात पोहोचताच शिवसैनिकांनी स्वागत केले. नंतर मोटरसायकल रॅलीद्वारे आदित्य ठाकरे पोस्टल मैदानात पोहोचले. येथे विद्यार्थ्यांशी त्यांनी आदित्य संवाद कार्यक्रमातून हितगूज साधले.विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल, पोलीस भरती, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बसफेरीची अडचण, शाळेत पिण्याच्या पाण्याची अडचण, नेर शहरातील शिवसेनेच्या ग्रंथालयाची अवस्था कथन केली. मुलींना स्वयंसंरक्षणाबाबत आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे भाव यावरही प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नसल्याचे मान्य करून यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. परीक्षेच्या आॅनलाईन व आॅफलाईन प्रक्रियेबाबत स्वत: आक्षेप नोंदविला. लोडशेडींगमुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरच आॅनलाईनची सक्ती करावी, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.विद्यापीठांच्या सेमिस्टर पॅर्टनचे निकाल वेळेत लागत नसल्याची खंतही विद्यार्थिनींनी मांडली. वसतिगृहात प्रवेश मिळत नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी मांडली. महिला महाविद्यालयांमध्ये पुरेशी जागा नसल्याने अनेक कोर्सेसला प्रवेश मिळत नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. शिवसेना नेत्यांनी पाच वर्ष खिशात राजीनामे बाळगल्याचा मुद्दाही एका युवकाने यावेळी मांडला. ठाकरे यांना अपर्णा राऊत, आशीष रिंगोले, नितीन उपाध्ये, विद्या मिसाळ, विकास वाणी, आशुतोष चिंचोळकर, राहुल पाटील, चारूदत्त पारधी, डॉ.किरण वरगने आदी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. काही प्रश्नांवर चर्चा झाली नाही. मात्र त्या प्रश्नांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी देत पुन्हा भेटीला नक्की येईल, असे सांगत दारव्ह्याकडे प्रयाण केले. कार्यक्रम लांबल्याने विद्यार्थी ताटकळतजनआशीर्वाद यात्रेचा ११ वाजता जिल्ह्यातील वटफळी येथे प्रवेश होणार होता. मात्र ही यात्रा उशिरा दाखल झाल्याने सर्वच कार्यक्रम लांबले. परिणामी आदित्य संवाद कार्यक्रमाला आलेल्या विद्यार्थ्यांना तीन तास ताटकळत बसावे लागले.कर्जमाफी शेतकºयांपर्यंत पोहोचलीच नाहीदारव्हा : शासनाने केलेली कर्जमुक्ती राज्यातील सर्व शेतकºयांपर्यंत पोहोचलीच नाही, अशी जाहीर कबुली युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. येथील शिवाजी स्टेडियमवर शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा झाला. त्यात त्यांनी ही कबुली दिली. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा येथे पोहोचताच नगरसेवक प्रकाश गोकुळे यांच्या नेतृत्वात बोरी ते दारव्हा दुचाकी रॅली काढण्यात आली. संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी कर्जमुक्ती मिळाली का, असा थेट सवाल जनतेला विचारला. त्यावेळी नाही असा सूर उमटला. त्यामुळे तुमच्यापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ पोहोचविण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आदित्य ठाकरे यांना दिग्रस मतदार संघातून निवडणुक लढविण्याची आॅफर दिली.
आदित्य ठाकरेंपुढे १२०० प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 10:19 PM
बुधवारी दुपारी २ वाजता नेर तालुक्यातील वटफळीमार्गे जनआशीर्वाद यात्रा जिल्ह्यात पोहोचली. तेथे ग्रामस्थांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांशी चर्चा करून ते नेर येथे आले. नेरमध्ये बाजार समिती परिसरात स्वागत झाल्यानंतर बैलबंडीतून त्यांनी मंच गाठला. या सभेतही आदित्य यांनी स्वत: काही बोलण्याऐवजी शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या.
ठळक मुद्देजनआशीर्वाद यात्रा : यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी मांडल्या समस्या