गती वाढणार : ४७ मंडळ कार्यालयात हब यवतमाळ : डिजीटल इंडिया योजनेच्या माध्यमातून इंटरनेटची गती वाढवून कामात पारदर्शकता आणण्यासाठी भारत नेट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यातील १२०४ ग्रामपंचायतींना जोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने कामकाज सुरू केले आहे. यासोबतच ४७ मंडळ कार्यालयात हब उभारण्यात येणार आहे. यामुळे कामाची गती १०० पटीने वाढणार आहे. भारत नेट प्रकल्पाच्या माध्यमातून १२०४ ग्रामपंचायतीला फायबर केबल अथवा वायरलेसच्या मदतीने जोडण्यात येणार आहे. यासाठी लॅटीट्यूड आणि लँगिड्यूड लोकेशन घेण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीची नेट कनेक्टिव्हिटी १०० एमबीपीएस कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे इंटरनेटची स्पिड वाढणार आहे. ई-गव्हर्नन्स प्रकल्पाच्या माध्यमातून कामकाजाची गती वाढविण्यासाठी मंडळाच्या ठिकाणी हब उभारले जाणार आहे. जिल्ह्यात १०१ मंडळ कार्यालय आहे. यापैकी ४७ ठिकाणी बीएसएनएलची पॉवरफुल लिंक आहे. या ४७ ठिकाणी हब उभारले जाणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने वर्क स्टेशनसाठी आठ लाख रूपयांचा निधी दूरसंचार निगमकडे वळता केला आहे. हे स्टेशन कार्यान्वित होताच एका राऊटवर २० लॅपटॉप पूर्ण क्षमतेने चालविता येणार आहे. ज्याकामाला पूर्वी १० मिनिटे लागत होती अथवा लिंक फेल झाल्यामुळे अनेक दिवस लागायचे, ते काम काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागात या योजनेसाठी ओएफसीचे जाळे उभारले आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ओएफसी लाईनवरुन बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे हायस्पीड इंटरनेट सेवा ग्रामीण भागात मिळेल. त्यातून ग्रामपंचायतीचा कारभार गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ही सेवा सुरळीत राहणे गरजेचे आहे. (शहर वार्ताहर)
भारत नेट प्रकल्पात १२०४ ग्रामपंचायती
By admin | Published: August 01, 2016 12:47 AM