लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना उपाययाेजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुसद, पांढरकवडा व यवतमाळ शहरांत एकूण १३ कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) जाहीर केले आहेत. त्यात सर्वाधिक पुसद शहरातील आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यातही यवतमाळ शहर, पुसद शहर व पांढरकवडा शहरांत ही संख्या अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या तीन नगर परिषद क्षेत्रात प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. या तिन्ही शहरांत प्रत्येकी दररोज ५०० स्वॅब घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळेल तो रहिवासी भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार रुग्ण आढळलेल्या परिसरात शनिवारपासून प्रशासनाने कंटेनमेंट झोनमध्ये चहूबाजूने बांबू लावून परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. तीन नगरपालिका क्षेत्रात एकूण १३ कंटेनमेंट झोन शनिवारी जाहीर करण्यात आले. त्यात सर्वाधिक आठ हे पुसद नगर परिषद क्षेत्रातील आहेत. पांढरकवडा तीन, तर यवतमाळ शहरातील दोन कंटेनमेंट झोन आहेत. कंटेनमेंट झोन सील केल्याने अत्यावश्यक कामाशिवाय तेथील नागरिकांना परिसराच्या बाहेर निघण्यास मनाई आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या आणखी वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
पांढरकवडात ‘आयटीआय’चे २८ विद्यार्थी पॉझिटिव्ह पांढरकवडा : दिवसेंदिवस हॉटस्पॉट ठरत असलेल्या पांढरकवडा येथील आयटीआयमधील तब्बल २८ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरून गेली आहे. पांढरकवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्वच प्रशिक्षणार्थी व निदेशकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २८ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले. अद्याप काही चाचण्यांचे रिपोर्ट मिळणे बाकी आहे.
उमरसरातील शिरे ले-आऊट, साईनाथ सोसायटी सील यवतमाळात उमरसरा परिसरातील शिरे ले-आऊट व साईनाथ सोसायटी, तर पांढरकवडा येथे पटेल ले-आऊटमधील साईनगर परिसर, रॉयल पार्क व मौजा बोथ गावातील एक भाग कंटेनमेंट झोन जाहीर केला गेला आहे. पुसदमध्ये प्रभाग क्र.२ मधील गडदेनगर, मैनाबाईनगर, प्रभाग क्र.४ मधील उदासी वाॅर्ड, प्रभाग क्र.५ मधील देवी वाॅर्ड, प्रभाग क्र.६ मधील सुभाष वाॅर्ड, प्रभाग क्र.१० मधील नारायणवाडी, शिवाजी पार्क, प्रभाग क्र.११ मधील मोतीनगर, टिळक वाॅर्ड, प्रभाग क्र.१२ मधील तुकाराम बापू वाॅर्ड आणि प्रभाग क्र.१४ मधील पांडे ले-आऊट, जयरामनगर, शंकरनगर व डुब्बे ले-आऊटचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.