टिपेश्वर अभयारण्य : शिकारीच्या तयारीत, १६ मोबाईल, बंदूक, आठ सत्तूर, वाहने जप्तप्रवीण पिन्नमवार पांढरकवडामध्य प्रदेशात शिकारी व गुन्हेगारी कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बहेलिया टोळीच्या सशस्त्र १३ सदस्यांना तेलंगणा सीमेवरील टिपेश्वर अभयारण्य परिसरात ताब्यात घेण्यात आले. पट्टेदार वाघाची शिकार करण्याच्या उद्देशाने ही टोळी आली होती का, या दृष्टीने वन विभागाची यंत्रणा तपास करीत आहे. या टोळीच्या ताब्यातून आठ मेटॅडोअर, छर्ऱ्याची बंदूक, आठ धारदार सत्तूर, १६ मोबाईल, हाडाचे तुकडे आदी साहित्य जप्त करण्यात आले. शुक्रवारपासूनच या टोळीवर वन अधिकाऱ्यांची पाळत होती. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने शनिवारी दुपारी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान शस्त्रे आढळून आली. राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर टिपेश्वर अभयारण्याच्या शेजारी कोपा मांडवी गावाजवळ या टोळीला ताब्यात घेण्यात आले. बिरसूसिंग बदनसिंग चितोरिया, चंद्रभानसिंग गिदरमानसिंग चितोरिया, किसन बदनसिंग चितोरिया, किसनसिंग छेदीसिंग चितोरिया, गोविंदसिंग किसनसिंग चितोरिया, राजेशसिंग श्यामसिंग सिंग, मंगलसिंग कतारसिंग चितोरिया, श्यामसिंग बदनसिंग चितोरिया अशी या टोळी सदस्यांची नावे आहेत. ते सर्व मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याचे रहिवासी आहेत. सुमारे १८ पट्टेदार वाघांचे अस्तित्व असलेल्या टिपेश्वर अभयारण्याशेजारी या टोळीने शुक्रवारी सायंकाळी आश्रय घेतल्याने वन अधिकाऱ्यांचा संशय बळावला. मध्य प्रदेशात ही टोळी वन्यजीवांच्या शिकारीत एक्सपर्ट मानली जाते. या टोळीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातही कारवाया आहेत का, याच्या तपासणीसाठी त्यांची माहिती मेळघाटच्या सायबर सेलला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त कागदपत्रेही या सेलला पाठविण्यात आली. पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी या बहेलिया टोळीच्या सदस्यांना ‘प्रसाद’ दिल्याचेही सांगितले जाते. वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक बी.जी. राठोड, टिपेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी जी.बी. लांबाडे, वाडे, मेहरे आदी या टोळीची चौकशी करीत आहे. वन विभागाने वृत्तलिहिस्तोवर त्यांना अटक केलेली नव्हती. धार्मिक कार्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही हैदराबादला गेलो होतो, जडीबुटीद्वारे औषधी बनवून ती विकण्याचा आमचा व्यवसाय असल्याचे या टोळीने वन विभागाला सांगितले. मात्र वन अधिकाऱ्यांचे त्यामुळे समाधान झाले नाही, म्हणूनच त्यांची मेळघाट व मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात खातरजमा केली जात आहे. टिपेश्वर अभयारण्याशेजारी आश्रय घेण्यामागे या टोळीचा नेमका हेतू काय? त्यांचे क्राईम रेकॉर्ड आहे का? या मुद्यांवर वन खात्याची चौकशी सुरू आहे. डीएफओ जी. गुरूप्रसाद स्वत: चौकशी करीत असल्याचे सांगितले जाते.
बहेलिया टोळीचे १३ सदस्य वन विभागाच्या ताब्यात
By admin | Published: January 24, 2016 2:19 AM