नगरपरिषद : विकास आराखड्याला मंजुरीची प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील बेघरांना घर उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर रोडवरील ट्रक टर्मिनल्सच्या जागेत एक हजार १७० घरांचा मेगा प्रकल्प प्रस्तावीत आहे. त्यासाठी तब्बल साडेतेरा हजार अर्ज आले आहेत. घरकुलाच्या संपूर्ण योजना शासनाने आता एकत्रित केल्या. रमाई आवास योजना व एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रम आता पंतप्रधान आवास योजनेतंर्गत राबविला जात आहे. रमाई आवास योजनेतून १४९ घरकुलांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी ८२ घरे पूर्ण झाली असून ६७ घरे अद्याप अपूर्ण आहेत. त्यासाठी केवळ ४१ लाखांचा निधी शिल्लक आहे. एकात्मिक झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत ५४० घरांचे काम पूर्ण झाले असून ३० घरांचे काम सुरू आहे, तर ३० घरे अद्याप कामाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील ३०० घरांसाठी निधीच नसल्याने ही योजना अडगळीत पडली. या घरकूल योजनांच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे. याशिवाय योजनेत पूरग्रस्त भाग आणि डीपी रोड येत असल्याने अडचण येत आहे. शहरात एकूण २८ झोपडपट्ट्या असून इंदिरानगर, पाटीपुरा, डोर्लीपुरा, तलावफैल, नेताजीनगर येथे घरकूले प्रस्तावित आहे. त्यासाठी एक कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. ज्या घरकुलांचे काम पूर्ण झाले, तेथे मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वाढीव निधीची गरज आहे.
यवतमाळातील एक हजार १७० घरकुलांसाठी १३ हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:49 AM