यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांमध्ये भराभर पाचवी आणि सातवी हे वर्ग वाढविलेले असताना विषय शिक्षकांचा मात्र तुटवडा होता. परंतु, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर १३०० विषय शिक्षकांची पदे भरण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून गुरुवारी यासंदर्भात आदेश काढण्यात आला. या आदेशानुसार, विज्ञान, गणित, भाषा आणि सामाजिकशास्त्र या विषयांसाठी प्रत्येकी एक विषय शिक्षक नेमण्यात येणार आहे. मध्यंतरी, विषय शिक्षकांच्या जागा पदवी अधिक बीएड झालेल्या उमेदवारांमधून भरण्याची मागणी पुढे आली होती. परंतु, आता या जागा जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या साडेआठ हजार शिक्षकांमधूनच भरण्यात येणार आहेत. म्हणजेच, डीएड अधिक पदवी ही पात्रता ग्राह्य धरली जाणार आहे. यासंदर्भात १७ ते २७ फेब्रुवारीदरम्यान शिक्षकांकडून पंचायत समिती स्तरावर विकल्प भरून घेतले जाणार आहे. हा विकल्प देताना शिक्षकांना भाषा की सामाजिकशास्त्र असा पर्याय निवडता येईल. जेथे विषय शिक्षकांची गरज आहे, अशा उच्च प्राथमिक शाळांमध्ये हे शिक्षक दिले जाणार आहे. त्यासाठी विकल्प भरून देताना शिक्षकांना आपल्या आवडीचा तालुकाही निवडता येणार आहे. त्यामुळे बदलीसाठी इच्छूक असलेल्या शिक्षकांनाही यात संधी मिळणार आहे. १ मार्च रोजी विषयनिहाय तात्पुरती ज्येष्ठता यादी जाहीर होईल. तर ६ मार्चला अंतिम ज्येष्ठता यादी जाहीर करून ती ९ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेकडे पाठविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व बीईओंना दिले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
१३०० शिक्षक नेमणार : पदवीधर शिक्षकांना बदलीचीही संधी
By admin | Published: February 11, 2017 12:19 AM