रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुऱ्या पावसामुळे राज्यातील २५ जिल्ह्यांत पीक स्थिती चिंताजनक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ जिल्हे दुष्काळाच्या ‘रेडझोन’मध्ये आले आहे. या जिल्ह्यांत दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता पाहाता शासनाने एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची आताच तरतूद करून ठेवली आहे.यावर्षी पाऊस उशिरा बरसला. जुलैमध्ये पेरण्या आटोपताच पावसाचा मोठा खंड पडला. गेल्या १७ दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा थेंंबही नाही. यामुळे अंकुरलेले बियाणे जागीच करपण्यास सुरूवात झाली आहे. पिकांनी माना टाकल्या. अपुऱ्या पावसाने यवतमाळ, वाशिम, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडारा, नंदूरबार, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड हे १४ जिल्हे रेडझोनमध्ये आले आहे. याव्यतिरिक्त नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि सांगली या ११ जिल्ह्यातही स्थिती बिकट आहे.राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीची स्थिती निर्माण होणार आहे. अशा ठिकाणी एक लाख क्विंटल बियाणे लागणार आहे. या बियाण्यांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना एक लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे वितरित केले जाणार आहे.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनाशेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि दुष्काळी भागाला संकटातून बाहेर काढण्यासाठी कृषी विभाग मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविणार आहे. या योजनेत पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले जाईल. यातून ड्रीप आणि स्प्रिंकलर घेता येईल. मोठ्या शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर लाभ दिला जाईल. त्याची अंमलबजावणी याच हंगामात केली जाणार आहे.
३0 टक्के पाऊस कमीविदर्भात एकूण पावसाच्या ३० टक्के, तर मराठवाड्यात ३३ टक्के कमी पावसाची नोंद झाली. कोकणात २० टक्के जादा, तर मध्य महाराष्ट्रात १० टक्के जास्त पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप एकाही जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके करपण्यास सुरूवात झाली. अनेक ठिकाणी पिकांवर गोगलगायींनी हल्ला चढविला आहे.४० टक्के क्षेत्रातल्या पेरण्या अद्याप बाकी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातही गंभीर स्थिती आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये भाताची रोवणी झाली. मात्र हा भागही पाण्याअभावी कोरडा पडत आहे. मध्य विदर्भातील हलक्या आणि मध्यम जमिनीतील सोयाबीन आणि कपाशीने माान टाकणे सुरू केले आहे. मूग, उडीदाचे पीकही कोमेजते आहे.हवामानाचा अंदाज खरा ठरेल काय ?हवामान खात्याने १८ ते १९ जुलैला विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविला. नंतर २३ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत पाऊस बरसेल, असे म्हटले. २ ऑगस्टनंतर पुन्हा उघाड पडेल. ऑगस्टमध्ये आणखी पाऊस बरसेल, असा अंदाज आहे. हा पाऊस बरसला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. प्रत्यक्षात यावर्षी आतापर्यंत हवामान खात्याचा अंदाज अनेकदा फोल ठरला. आता पुढचा तरी अंदाज खरा निघेल काय? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र पाऊस न आल्यास दुबार पेरणीची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यावर मात करण्यासाठी अतिरिक्त बियाण्याची तरतूद करण्यात आली आहे.- डॉ.अनिल बोंडे, कृषीमंत्री