सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घरे मिळावित यासाठी नगरपरिषदेकडून सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. याला यश प्राप्त झाले आहे. राज्य व केंद्रीय स्तरावरच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यामुळे वडगाव रोड येथे घरकूल बांधण्यासाठी महसूल विभागाने १३ हेक्टर ९२ आर इतका भूखंड उपलब्ध करून दिला आहे. शिवाय नागपूर मार्गावर पहिल्या टप्प्यातील घरकूल बांधकामाला सुरूवात केली जाणार आहे.केंद्र सरकारने घरकुलासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून सर्व सोयींनी सुसज्ज अशा संकुलाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून नागपूर मार्गावर आरटीओ कार्यालय परिसरातलगत असलेल्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम केले जात आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याशिवाय वडगाव रोड येथील सर्व्हेनंबर ६५ मध्ये ९ हेक्टर २२ आर तर सर्व्हेनंबर ४१ मध्ये ४ हेक्टर ७४ आर जमीन महसूल विभागाने नगरपरिषदेला देण्याचे मान्य केले आहे. या भूखंडासाठी राज्यातील उच्चाधिकार समितीने २१ जून रोजी एनओसी दिली. त्यानंतर दिल्ली येथील केंद्रीय उच्चाधिकारी समितीनेसुध्दा २५ जून रोजी हा प्रस्ताव मंजूर केला. या आदेशावरून महसूल विभागाने नगरपरिषदेला भूखंड देण्याचा आदेश केला. ही जागा घेण्यासाठी नगरपरिषदेला नाममात्र एक रुपया प्रती चौरस मीटर इतके शुल्क मोजावे लागणार आहे. जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने आता कामाला गती मिळणार आहे.नागपूर मार्गावर तीन ‘टाईप’ची घरेपहिल्या टप्प्यात ९७३ घरकुले बांधकामासाठी निविदा बोलविण्यात आल्या आहेत. नागपूर मार्गावरील सर्व्हे नंबर ४९ मध्ये हे संकूल उभे राहत आहे. यामध्ये तीन टाईपची घरे राहणार आहे. टाईप एकमध्ये २६.८० चौरस मीटर घरकूल असून त्यासाठी ३१५ लाभार्थ्यांची निवड केली आहे. यात रस्त्यावर अतिक्रमण करून राहणारे कुटुंब आहेत. शासकीय रुग्णालय परिसर, पिंपळगाव परिसर आणि राणीसती मंदिर परिसरातील अतिक्रमणधारकांना लाभ दिला जाणार आहे. तर टाईप दोन व तीनमध्ये घरे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वितरित केली जाणार आहे. यासाठी टाईप दोनकरिता वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आतील तर टाईप तीनचे घर वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाखांच्या आत असणाऱ्या व्यक्तीला घेता येऊ शकतात. या घरांची किंमत अद्याप ठरलेली नाही. मात्र शासन अनुदानाचे अडीच लाख यांना मिळणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर लगेच वडागाव येथे दोन मोठ्या प्रकल्पांची सुरूवात होणार आहे.
नगरपरिषदेला घरकुलांसाठी १४ हेक्टरचा भूखंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:33 PM
प्रधानमंत्री आवास योजनेतून बेघरांना घरे मिळावित यासाठी नगरपरिषदेकडून सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. याला यश प्राप्त झाले आहे. राज्य व केंद्रीय स्तरावरच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिल्यामुळे वडगाव रोड येथे घरकूल बांधण्यासाठी महसूल विभागाने १३ हेक्टर ९२ आर इतका भूखंड उपलब्ध करून दिला आहे.
ठळक मुद्देउच्चाधिकार समितीची मान्यता : यवतमाळ शहरात ९७३ घरकुले बांधकामासाठी निविदा, प्रधानमंत्री आवास योजना