रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोविडच्या प्रकोपाने समाज जीवनात मोठी उलथापालथ केली आहे. कोविड संकटाने अनेक बालकांचे आई-वडील हिरावले आहेत. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात कोविडमुळे आई किंवा वडिलांपैकी एक जण गमाविलेल्या बालकांची संख्या ३४८ एवढी आहे. तर इतर कारणांमुळे अनाथ झालेल्या बालकांची संख्या १४ हजार एवढी आहे. या पोरक्या मुलांचे आता सरकारलाच मायबाप व्हावे लागणार आहे. प्रशासनाने या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात ३४८ बालकांच्या संगोपनाचा खर्च सरकार उचलणार आहे. जिल्ह्याने कोरोनाच्या प्रकोपाचा सामना केला आहे. यामध्ये आतापर्यंत ७२ हजार नागरिक कोरोनाबाधित झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७८६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा आधार असलेले ३४८ पालक मृत्यूमुखी पडले आहे. या पालकांची मुले आता छत्र हरविल्याने एकाकी पडले आहेत. यातील चार बालकांचे माता-पिता राहिले नाही. तर इतर बालके एक पालकाच्या छत्रछाये खाली आहेत. अनेकांचे आई-वडील महामारीत गमावल्या गेले. त्यांच्या कुटुंबात कमावता व्यक्ती राहिला नाही. तर काही कुटुंबात आई-वडिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने उरलेल्या एकावर संगोपनाची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली असल्याचे महिला बाल कल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सर्वेक्षण मोहिमेत ३४८ बालके छत्रछाया नसल्याचे पुढे आले. यासोबतच १३ हजार ३३३ बालकांना एक पालक असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले. अशा बालकांसाठी महिला बाल कल्याण विभागाची बालसंगोपन निधी योजना राबविण्यात येते. बाल संगोपन समिती त्यासाठी शिफारस करते. बालकाच्या शिक्षणासाठी महिन्याला ११०० रुपये दिले जातात. तर दोन पालक हरविलेल्या बालकांना पाच लाख रुपयापर्यंतचा मदत निधी मिळतो. पहिल्या टप्प्यात २४५ बालके आहेत.
विविध विभागाकडून चाचपणी - महिला बाल कल्याण विभागाकडून बाल संगोपन निधी दिला जातो. कोविडच्या अनुषंगाने त्यामध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनाथ बालकांची संख्या जिल्ह्यात मोठी असल्याने अशा एक पालक असणाऱ्या बालकांसाठी कुठल्या उपाययोजना करता येतात या दृष्टीने प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभाग, खनिकर्म विभाग, मानव विकास मिशन विभाग, जिल्हा नियोजन समिती या ठिकाणावरून तरतुदीबाबत विचार होत आहे.
- एक पालक असलेल्या कुटुंबामध्ये आर्थिक हातभार लागावा याकरिता कौशल्य विकास योजनेमधून अशा पालकांना विविध विषयाचे प्रशिक्षण देता येईल का याबाबतही विचार केला जात आहे. व्यवसायाकरिता इच्छुक असणाऱ्या पालकांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी विचार केला जात आहे.
कोविडमुळे माता-पिता हरविलेल्या बालकांचा शोध घेताना या व्यतिरिक्त एक पालक असणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. यामधून हा आकडा पुढे आला आहे. बाल संगोपन निधीतून मदत दिली जाणार आहे. सर्वेक्षणातून पुढे आलेल्या बालकांची माहिती घेतली जाणार आहे. - अमोल येडगे जिल्हाधिकारी, यवतमाळ