लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी दोन तासात १४.२९ टक्के मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दारव्हा, नेर, बाभूळगाव, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, आर्णी, घाटंजी, कळंब, राळेगाव, केळापूर, झरीजामणी, वणी, मारेगाव या तालुक्यासह यवतमाळ शहरातील केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु होती. महिला मतदारांच्या मतदानाचे प्रमाण अतिशय कमी दिसून आले. दोन तासात केवळ ११९ महिला मतदारांनी मतदान केले. तर ६६३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.