संतोष कुंडकर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : 'वावर आहे तर पॉवर आहे' असं म्हणतात आणि ते खरंही आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी शेतीला फारसे मूल्य नव्हते. मात्र, आता शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातही शहराला लागून असलेल्या शेतीचे भाव प्रती एकरी करोड रुपयांच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांत वणी शहराच्या सभोवताल नागरी वसाहती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. बिल्डर्सकडून शहरालगतची शेती खरेदी करून तेथे ले-आऊट टाकले जात आहेत. यवतमाळ रोड, मुकुटबन रोड, भालर रोड, नांदेपेरा रोड या मार्गावर अनेक नवीन ले-आऊट तयार झाले आहेत. अनेकजण गुंतवणूक करण्यासाठी शेती व प्लॉट खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे शहराच्या अवती-भोवती असलेल्या ले-आऊटमधील प्लॉटच्या किमतीदेखील गगनाला भिडल्या आहेत. शेतीचे भाव वाढल्याने प्लॉटच्या किमतीदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. कोरोना काळात शेतीचे भाव कमी झाले होते. मात्र, कोरोना काळ संपल्यानंतर शेतीच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
सर्वसामान्य काय म्हणतात...जमिनी कमी झाल्या आणि ले- आऊटची संख्या वाढली. ले-आऊटसाठी जमिनींची मागणी वाढल्याने जमिनींचे भावही वाढले. - खुशाल कवरासे
"ले-आऊटयोग्य जमिनी कमी आहेत. जेथे पाण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी गृहप्रकल्प उभारले जात आहेत."- पराग हनुमंते.
गृहप्रकल्प या परिसरात वाढले
- गणेशपूर : वणी शहरालगच्या गणेशपूर या भागात गृहप्रकल्प वाढले आहेत. या भागात अनेक ले-आऊट आहेत.
- वणी बायपास : वणी-यवतमाळ बायपासवरदेखील अनेक ले-आऊट असून, या ठिकाणी नागरी वसाहती उभ्या झाल्या.
- मुर्धोनी मार्ग : वणी-मुधोंनी मार्गावरही नागरी वसाहती वाढल्या असून, या भागात अनेक गृहप्रकल्प उभे आहेत.
कोणत्या भागात एकरी काय दर?नांदेपेरा रोडला सव्वा कोटीचा दर वणी ते नांदेपेरा मार्गावर ले- आऊटयोग्य शेतीचे दर प्रतिएकर एक ते सव्वा कोटी सांगितले जात आहे.
मुकुटबन रोडला एक कोटीचा दर वणी ते मुकुटबन मार्गावर सध्या शेतीचे दर एक ते सव्वा कोटी रुपये प्रतिएकर सांगितले जात आहेत.
यवतमाळ रोडला दीड कोटीचा दर वणी-यवतमाळ या राज्य महामार्गावर शहरालगत अनेक ले-आऊट आहेत. येथे शेतीचा सव्वा ते दीड कोटी भाव आहे.
मुर्धोनी रोडला एक कोटीचा दर वणी ते मुधोंनी मार्गावरही शेतीचे दर वधारले आहेत. येथे एक कोटी रुपये प्रतिएकर दर सांगितला जात आहे