यवतमाळ : शहरातील तारपुरा परिसरात राहणारा बालक घराजवळच्या मुलींसोबत टिफीन पोहोचविण्यासाठी दुचाकीवर बसून गेला. त्यानंतर कॉटन मार्केट चौक परिसरात आरोपीने त्या बालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवर बसविले. त्याला नारंगी नगर परिसरातील मैदानात नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दरम्यान घडली. या घटनेची माहिती मुलींनी पालकांना दिली, त्यानंतर सदर बालकाची शोधाशोध सुरू झाली.
समीर इसराइल शेख (वय 23 रा. परदेशी पुऱ्यामागे तारापुरा यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. पीडित बालक नेहमीच शेजारी राहणाऱ्या मुलींसोबत टिफिन वाटप करण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे तो गुरुवारीसुद्धा ताईंसोबत दुचाकीवर बसून टिफिन वाटपासाठी गेला. दरम्यान, धामणगाव मार्गावरील जाजू कॉलेज जवळ त्याचे अपहरण करून आरोपी समीरने त्याला नारंगी नगर परिसरातील मैदानावर नेले. या घटनेनंतर तत्काळ दोन्ही मुलींनी बालकाचे अपहरण झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली, कुटुंबीयांनी तत्काळ शहर पोलीस स्टेशन गाठले घटनेची माहिती ठाणेदारांना देण्यात आली.
या प्रकाराचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ शोध घेणे सुरू केले. रात्री दीड वाजताच्या दरम्यान आरोपी समीर इस्राईल शेख हा हाती लागला. तर पीडित बालक घटनेनंतर तलावफल मार्गे पायदळ घराकडे निघाला, त्याने पालकांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ही घटना वेळेत उघडकीस आल्याने व आरोपीला अटक झाल्यामुळे मोठा तणाव निवळला. धार्मिक व जातीय तणाव निर्माण होण्याचा धोका होता. पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. तसेच बाल लैगिंक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. आरोपीच्या अटकेची कारवाई शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकाने केली. घटनेनंतर अवघ्या तीन तासात आरोपीला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला.